SSC Scam: पार्थ चॅटर्जी अन् अर्पिता मुखर्जीचे बांगलादेश कनेक्शन?; ईडीच्या हाती धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 08:15 PM2022-07-30T20:15:41+5:302022-07-30T20:23:13+5:30
पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जीचे बांगलादेश कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली- पश्चिम बंगालमधील ममता सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी देशभरात चर्चेत आले आहेत. पार्थ चॅटर्जीला ईडीने अटक केली आणि चॅटर्जीची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherjee) घरांवर छापेमारी केली. यात आतापर्यंत ५० कोटींहून अधिकची रोख आणि अनेक किलो सोने सापडले आहे.
ईडीच्या चौकशीत अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पार्थ चॅटर्जी देऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. तसेच रोज ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. पार्थ चॅटर्जी मिळत असलेल्या पैशांतील काही पैसे हे हवालामार्फत बांगलादेशमध्ये पाठवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जीचे बांगलादेश कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे. पार्थ चॅटर्जी मिळत असलेल्या पैशांतील काही पैसे हे हवालामार्फत बांगलादेशमध्ये पाठवत होते. या पैशांतून बांगलादेशात बेनामी नावाने जमीन आणि घरे खरेदी करण्यात येत होती. इतर काही पैसे हे दुसऱ्या देशांतही पाठवले जात असल्याची शक्यता आहे. तसेच दोन मोठ्या कंपन्या पार्थ चॅटर्जी यांच्या मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी होत्या, असा ईडीचा दावाही आहे, असं टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, ईडीच्या छाप्यात ५५.४३ कोटींहून अधिकची रक्कम सापडली आहे. सोन्याची एकूण रिकव्हरी सुमारे ५ किलो आहे, ज्यामध्ये १-१ किलो वजनाच्या ३ सोन्याच्या पीटा आहेत, अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याच्या पेनाचा समावेश आहे. ईडीच्या गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दोन छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण ५०.३६ कोटी रुपये रोख आणि ५.०७ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणात अधिक कारवाई करण्यात येत असून घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे शिक्षक भरती घोटाळा?
पश्चिम बंगालच्या सरकारमधील एका मंत्र्यावर करण्यात येत असलेली कारवाई ही संपूर्ण शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. २०१६ मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु झाली होती. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये लाखो रुपयांची लाच घेऊन नापास उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप देखील केला होता. तसेच यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.