कर्मचारी कपात सुरूच राहणार; पुन्हा हजाराेंच्या नाेकऱ्या जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 10:20 AM2023-04-29T10:20:03+5:302023-04-29T10:20:49+5:30
पुन्हा हजाराेंच्या नाेकऱ्या जाणार, भरतीचाही वेग मंदावला
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आर्थिक वाढ मंदावल्यामुळे जगभरातील अनेक कंपन्यांत कर्मचारी कपातीचे सत्र सुरूच असून, आता आणखी काही कंपन्यानी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. क्लाउड क्षेत्रातील वाढ मंदावल्यामुळे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोस्थित कंपनी ‘ड्रॉपबॉक्स’ने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनी १६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. २०२२च्या अखेरीस कंपनीत ३,११८ पूर्णवेळ कर्मचारी होते. त्यातील क्लाउड स्टोअरेज व्यवसायातील ५०० कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे.
क्लब हाउसमध्ये कपात
ऑडियो ॲप ‘क्लब हाउस’ने अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. कोविड-१९ साथीच्या काळात ग्राहकांच्या बदललेल्या सवयी आणि वर्क फ्रॉम होमच्या गुंतागुंतीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये कंपनीमध्ये सुमारे १०० कर्मचारी होते.
ॲमेझॉनच्या उपकंपनीतही
कर्मचाऱ्यांना बसविणार घरी
ॲमेझॉनची उपकंपनी ॲमेझॉन स्टुडिओ आणि प्राइम व्हिडीओ डिव्हिजनमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० कर्मचारी अथवा डिव्हिजनच्या ७ हजार कर्मचाऱ्यांच्या सुमारे १ टक्का कर्मचारी काढले जाऊ शकतात. या क्षेत्रातील वॉल्ट डिझनी कंपनीने याआधीच ७ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
गेल्या तिमाहीत स्टार्टअप्सकडून ९,४०० जणांना मिळाले नारळ
n मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत स्टार्टअप्सने ९ हजार ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. निधी पुरवठा कमी झाल्यामुळे आणखी कपात हाेण्याची शक्यता आहे.
n खर्च कमी करणे तसेच फंडिंग घटल्यामुळे स्टार्टअप्सनेही नाेकरभरती कमी केली आहे. पुढील सहा महिने अशीच स्थिती राहू शकते.
आयटी कंपन्यांचाही भरतीत हात आखडता
कंपनी २०२१-२२ २०२२-२३ घट (%)
टीसीएस १,०३,००० २२,००० -७८
इन्फाेसिस ५४,३९६ २९,२१९ -४६
एचसीएल ३९,९०० १७,०६७ -५७
विप्राे ४५,४१६ १३,७९३ -७०
टेक महिंद्र ३०,११९ १,२२७ -९६