माजी खासदार अली अन्वर अन्सारींनी राम मंदिरावर प्रश्न उपस्थित केला अन् स्टेजच कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:51 PM2024-01-19T17:51:10+5:302024-01-19T17:58:17+5:30
बिहारमध्ये माजी खासदार अली अन्वर अन्सारी यांनी एका सभेत राम मंदिराबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र याच दरम्यान स्टेज कोसळला.
अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे, काही लोक अजूनही राम मंदिराबाबत प्रश्न उपस्थित करत वाद निर्माण करण्यापासून मागे हटलेले नाहीत. अशीच एक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये माजी खासदार अली अन्वर अन्सारी यांनी एका सभेत राम मंदिराबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र याच दरम्यान स्टेज कोसळला.
पसमांदा वंचित महासंघटनेने 18 जानेवारी 2024 रोजी गयाच्या डिहुरी गावात स्वातंत्र्य सैनिक अब्दुल कौम अन्सारी यांच्या 51 व्या पुण्यतिथी सभेचे आयोजन केलं होतं. पसमांदा वंचित महासंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार अली अन्वर अन्सारी हे देखील या सभेत सहभागी झाले होते.
सभा चालू होती आणि आयोजित सभेच्या मंचावरून वक्ते सभेला संबोधित करत होते. सभेला संबोधित करताना राम मंदिरावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. याच वेळी संपूर्ण मंच अचानक कोसळला. या घटनेदरम्यान मंचावर बसलेले सर्वजण जमिनीवर पडले. स्टेज कोसळल्यामुळे पसमांदा वंचित महासंघटनेचे खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष अली अन्वर अन्सारी यांच्या पायाला दुखापत झाली.
स्टेज कोसळल्यानंतर जमिनीवर टेबल ठेवून सभा पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार अली अन्वर अन्सारी म्हणाले की, आम्ही येथील लोकांना स्टेज तुटणार तर नाही ना असं विचारलं होतं, तेव्हा लोकांनी स्टेज तुटणार नाही असं सांगितलं. आम्ही गंमतीने म्हटलं की खूप थंडी आहे, स्टेजही थंडीने कुडकुडत आहे आणि त्याचदरम्यान स्टेज कोसळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.