स्टॅलिन आता द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष
By admin | Published: January 5, 2017 02:55 AM2017-01-05T02:55:25+5:302017-01-05T02:55:25+5:30
तामिळनाडूतील द्रमुक पक्षामध्ये नेतृत्वात फेरबदल करण्यात आले असून करुणानिधी (९३) यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन (६३) यांच्याकडे आता कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे
चेन्नई : तामिळनाडूतील द्रमुक पक्षामध्ये नेतृत्वात फेरबदल करण्यात आले असून करुणानिधी (९३) यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन (६३) यांच्याकडे आता कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे. करुणानिधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
स्टॅलिन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देताना त्यांना सर्वाधिकारही प्रदान करण्यात आले आहेत. द्रमुकच्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एम. के. स्टॅलिन हे सध्या कोषाध्यक्ष म्हणून काम करीत होते. अलीकडच्या काळात करुणानिधी यांना दोन वेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तर सध्याही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गत ५० वर्षांत प्रथमच पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीस ते उपस्थित नव्हते.
जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकच्या प्रमुखपदी शशिकला नटराजन यांची निवड झाल्यानंतर दोन दिवसांतच द्रमुकने हा निर्णय घेतला आहे. पक्षाचे महासचिव के. अनबझागन यांनी स्टॅलिन यांच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. स्टॅलिन यांच्या निवडीनंतर द्रमुकच्या मुख्यालयात आणि निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. स्टॅलिन यांचे मदुराईतील मोठे बंधू एम. के. अळगिरी यांना २०१४ मध्ये पक्षविरोधी कारवायांच्या कारणास्तव पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे. (वृत्तसंस्था)
जड अंत:करणाने जबाबदारी स्वीकारत आहे : स्टॅलिन
या निवडीनंतर बोलताना स्टॅलिन म्हणाले की, करुणानिधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या पार्श्वभूमीवर नवी जबाबदारी अतिशय जड अंत:करणाने स्वीकारत आहे. नव्या जबाबदारीचा मला अभिमान आणि आनंद आहे. अर्थात,
आज आपणाला अध्यक्ष बनण्याचा ‘तो’ आनंद नाही.
आमच्या पक्षाचे अध्यक्ष, महासचिव अथवा अन्य वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आपण चालणार आहोत. सर्वांच्या सहकार्यानेच पक्षाचे काम पुढे नेऊ. ही जबाबदारी
पार पाडताना मला निश्चितच आनंद होईल.
माझ्याकडे हे पद अचानक आलेले नाही, तर या मुद्यावर चर्चा, विचारविनिमय करून निर्णय घेण्यात आला आहे. आजारानंतर आता करुणानिधी हे पूर्णपणे बरे होत आहेत.
त्यांना आता आरामाची आवश्यकता आहे.