‘चाय पे चर्चा’ चालणारा मोदींचा तो स्टॉल बंद
By Admin | Published: August 22, 2016 06:56 PM2016-08-22T18:56:35+5:302016-08-22T18:56:35+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या काळातही मोदी यांच्या ‘चहा’वर अनेक चर्चा झडल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या अहमदाबादेतील स्टॉलवरून ‘चाय पे चर्चा’ सुरू झाली तो स्टॉल आता महापालिकेने बंद केला आहे
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २२ : लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या काळातही मोदी यांच्या ‘चहा’वर अनेक चर्चा झडल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या अहमदाबादेतील स्टॉलवरून ‘चाय पे चर्चा’ सुरू झाली तो स्टॉल आता महापालिकेने बंद केला आहे. देशभरात प्रकाशझोतात आलेल्या या स्टॉलला अनधिकृत असल्यामुळे या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
भाजपच्या प्रचार मोहिमेची धुरा सांभाळणारे प्रशांत किशोर यांच्या कल्पनेतून ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम देशभर होत होता. सारखेज- गांधीनगर महामार्गावर ‘इस्कॉन गांथीया’ हा नाश्ता व चहाचा स्टॉल गत चार वर्षांपासून सुरू होता. अहमदाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ठिकाणी अनधिकृतपणे हा स्टॉल चालविण्यात येत होता. येथील ग्राहकांच्या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा येत होता.
अगोदर नोटीस देऊन गत आठवड्यात हा स्टॉल बंद करण्यात आला आहे. अहमदाबादेतील या स्टॉलची पे्ररणा घेऊन देशात अनेक ठिकाणी ‘चाय पे चर्चा’ झडत होत्या; पण या स्टॉलने कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती, असे सांगत आता महापालिकेने या स्टॉलवर कारवाई केली आहे. परवानगीशिवायच येथे चार वर्षांपासून हा स्टॉल सुरू होता, त्यामुळे तो आता बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.