महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीनंतर काही तासांनी दुसरी चेंगराचेंगरी; जेसीबीने हटवला कपड्यांचा ढिगारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:20 IST2025-01-30T16:18:15+5:302025-01-30T16:20:52+5:30

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात दोनवेळा चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Stampede at other places second time in Mahakumbh eyewitnesses told | महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीनंतर काही तासांनी दुसरी चेंगराचेंगरी; जेसीबीने हटवला कपड्यांचा ढिगारा

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीनंतर काही तासांनी दुसरी चेंगराचेंगरी; जेसीबीने हटवला कपड्यांचा ढिगारा

Prayagraj Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता त्रिवेणी संगमच्या काठावर चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला. तर ६० पेक्षा अधिक भाविक जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. कुंभमेळा प्रशासनाने तब्बल २० तासांनी मृतांची आकडेवारी जाहीर केली होती. मात्र आता मात्र या चेंगराचेंगरीनंतर अवघ्या काही तासांतच दुसरी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. संगमाच्या टोकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर दुसऱ्यांदा चेंगराचेंगरी झाल्याचे म्हटलं जात आहे.

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला बुधवारी मौनी अमावास्येसाठी संगमावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली. मध्यरात्री दुर्घटना घडून गेल्यानंतर संध्याकाळी आकडेवारी समोर आल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली. दुसरीकडे आता इंडिया टुडेच्या वृत्तानुसार महाकुंभमेळ्यात आणखी एक चेंगराचेंगरीची घटना झाल्याचे समोर आलं आहे. उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

दुसऱ्यांदा झालेल्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणी विखुरलेले कपडे आणि चपलांच्या ढिगाऱ्यांमुळे मोठी दुर्घटना झाल्याचे म्हटलं जात आहे. मात्र तिथल्या मृत आणि जखमींच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेलं नाही. मात्र, या चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागल्याचा दावा केला जातोय. ट्रॅक्टरच्या साहाय्याने चेंगराचेंगरीच्या ठिकाणावरुन कपडे, बूट आणि बाटल्यांचे ढीग हटवण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की लोक खाली चिरडले गेले आणि नंतर तिथून मृतदेह बाहेर काढले आहेत.

दुसऱ्यांदा घडलेली चेंगराचेंगरीची घटना झुंसी येथे घडली. झुंसी हे संगमाच्या ठिकाणापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. गंगा नदीच्या उत्तरेकडील तीरावर असलेल्या झुंसी मार्गेही संगमाच्या ठिकाणी पोहोचता येते. पहाटे दोनच्या सुमारास पहिली चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर झुंसी येथे सकाळी सहाच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. तिथे मृतदेह पडले होते आणि कोणीही त्यांना विचारत नव्हते. सकाळी गुदमरून मृत्यू झालेल्या लोकांना दुपारी दीड वाजेपर्यंत रुग्णालयात नेलं जात होतं. चेंगराचेंगरीनंतर चार तासांनी एक महिला कॉन्स्टेबल आली. पोलीस लोकांना व्हिडिओ बनवण्यापासून रोखत होते, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

दरम्यान, महाकुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक अजूनही स्नान करण्यासाठी आले असल्यामुळे आणि दहशत पसरू नये म्हणून दुसऱ्या चेंगराचेंगरीबद्दल माहिती देण्यात आली नसल्याचे म्हटलं जात आहे. दुसरीकडे, स्नानासाठी गर्दी इतकी मोठी होती की सर्वांच्या पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली. लोकांनी बॅरिकेड्स तोडण्यास संगमावर जाण्यास सुरुवात केली. मात्र काही भाविक तिथेच झोपले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी आल्याने झोपलेल्या भाविकांवर काही लोक पडले आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली.

Web Title: Stampede at other places second time in Mahakumbh eyewitnesses told

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.