स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा शो रद्द, अपर्णा यादव यांनी काय घेतला आक्षेप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:11 IST2025-02-16T16:09:35+5:302025-02-16T16:11:14+5:30
Anubhav Singh Bassi News: स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा लखनौमधील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याचा कार्यक्रमासंदर्भात भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांनी तक्रार केली होती.

स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा शो रद्द, अपर्णा यादव यांनी काय घेतला आक्षेप?
इंडियाज गॉट लेटेंट शोमधील वादाचा फटका स्टॅण्डअप कॉमेडियन्सनाही बसताना दिसत आहे. समय रैनाचे दोन शो रद्द करण्यात आल्यानंतर आता स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सी याचा लखनौमध्ये होणारा शो रद्द करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांनी यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतर हा शो रद्द करण्यात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनुभव सिंह बस्सी याच्या शोबद्दल महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांनी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांना पत्र पाठवले होते. त्यांनी म्हटले होते की, अनुभव सिंह बस्सीच्या जुन्या शोमध्ये अपशब्द, अश्लील भाषा वापरण्यात आलेली आहे. ज्यातून समाजात चुकीचा संदेश जात आहे.
अनुभव बस्सीचा शो रद्द
मला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजले की, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये अनुभव सिंह बस्सीचा कॉमेडी शो आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचे जुने शो बघितले. त्यातून हे स्पष्ट दिसले की, तो अपशब्द आणमि अश्लील भाषेचा वापर करतो. अशा कार्यक्रमांना परवानगी द्यायला नको, असे अपर्णा यादवांनी पत्रात म्हटले होते.
अशा कार्यक्रमांवर बंदी घाला -यादव
अपर्णा यादव यांनी प्रशासनाकडे १५ फेब्रुवारीचा शो रद्द करण्याची मागणी करण्याबरोबरच भविष्यातही बस्सीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये.
"कॉमेडीच्या नावावर कोणत्याही प्रकारे अश्लीलता स्वीकारली जाऊ शकत नाही. अशा कार्यक्रमांवर बंदी घातली पाहिजे", असे त्यांनी पोलीस प्रशासनाला म्हटले आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या विधानानंतर मुद्दा चर्चेत
इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या एका विधानामुळे स्टॅण्डअप कॉमेडी शो मध्ये वापरण्यात येणाऱ्या भाषेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्टॅण्डअप कॉमेडीयन अश्लाघ्य भाषेचा वापर करतात, असा मुद्दा आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.