चिनाब नदीवर उभा राहतोय आयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल

By admin | Published: June 13, 2017 11:11 AM2017-06-13T11:11:53+5:302017-06-13T14:35:38+5:30

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतातील चिनाब नदीवर बांधला जात असून त्याची उंची पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही जास्त असणार आहे

Standing on the Chenab River, the High Railway Bridge is more than the Eiffel Tower | चिनाब नदीवर उभा राहतोय आयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल

चिनाब नदीवर उभा राहतोय आयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 13 - जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतातील चिनाब नदीवर बांधला जात असून त्याची उंची पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही जास्त असणार आहे. या पूलाची उंची 359 मीटर असणार आहे. हा रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षाही 30 मीटर उंच असणार आहे. जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर या पुलाचं काम सुरु आहे. रेआसी जिल्ह्यात बांधकाम सुरु असलेला हा पूल जून 2019 पर्यंत पुर्णपणे तयार असेल. पुलाचं 66 टक्के काम पुर्ण झालं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ३२६ किलोमीटरचा उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल्वे जोडणी प्रकल्प सुरु आहे. चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पुल साकारण्याचे काम कोकण रेल्वेकडून केले जात आहे.
 
चिनाब नदीवरील हा पुल जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा मानला जातो. अशा या पुलाचे काम २00२-0३ पासून सुरु करण्यात आले. नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर पुल साकारताना कोकण रेल्वेला मोठे आव्हान स्वीकारावे लागत असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले आहे. आयफेल टॉवरची उंची ही ३२४ मीटर तर कुतूबिनारची उंची ही ७२ मीटर एवढी आहे. त्यामुळे जगातील सर्वात उंच असा पुल बांधण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. 
 
चिनाब नदीवरील 1.3 किमी लांबीच्या या पुलासाठी एकूण 1,250 कोटींचा खर्च येणार असल्याचं कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता आर के सिंग यांनी सांगितलं आहे. हा पूल 2019 पर्यंत तयार व्हावा यासाठी 1300 कामगार आणि 300 इंजिनिअर्स दिवसरात्र मेहनत करत असल्याचंही त्यांनी सागितलं आहे. 
 
2004 रोजी या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र 2008-09 रोजी परिसरात जोराचे वारे वाहत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काम थांबवण्यात आलं होतं. प्रती तास 100 किमी वेगाने वाहणा-या वा-याचा विचार करता रेल्वेने पूल बांधण्यासाठी चिनाब नदीवरच दुसरी जागा शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र शेवटी हीच जागा योग्य असल्याचं ठरलं अशी माहिती उपमुख्य अभियंता आर आर मलिक यांनी दिली आहे. 
 
हा पूल उभारल्यानंतर त्याला असणारा दहशतवाद्यांकडून धोका पाहता कोकण रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टिने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. पुलाच्या बांधकामात उच्च दर्जाची सामुग्री वापरण्यात आली असून ४0 किलोग्रॅम आरडीएक्स किंवा टीएनटीसारखे भयंकर स्फोटके वापरुन स्फोट घडविल्यासही पुलाला फारसा धक्का लागणार नाही आणि या पुलावरुन ट्रेन सुखरुप धावू शकेल, याची खबरदारी घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. चिनाब नदीवर बांधण्यात येणारा पुल २0१८-१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही कोकण रेल्वेने दिली आहे.
 
पुलाच्या बांधकामासाठी २५ हजार मेट्रीक टन स्टील वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर पुल बांधल्यानंतर त्यावर उभारण्यात येणाऱ्या रेल्वे रुळाच्या बाजूलाच वरच्या भागात काही जाळयाही बसविण्यात येतील. जेणेकरुन एखाद्या ट्रेनमधून जाताना दहशतवाद्यांनी स्फोटके टाकल्यास ती जाळीत अडकतील. मजबूत स्टीलचे बांधकाम आणि स्फोटकांमुळे पुलाला फारसा धक्का बसू नये यासाठी बांधकामाचे करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुल सुरक्षित राहील याची पुरेपुर काळजी घेण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले. 
 
चिनाब पुलाला आधार देण्यासाठी आर्च स्पेनचा (कमानी)आधार देण्यात येणार आहे. मुख्य कमानी जवळपास ४६७ मीटर एवढी असेल. या पुलाचं आयुष्य जवळपास 120 वर्ष इतकं असेल. 
 

Web Title: Standing on the Chenab River, the High Railway Bridge is more than the Eiffel Tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.