बापरे! ‘माकड’ बनलं मोहम्मदच्या मृत्यूचं कारण; पत्नी अन् ५ मुलं झाली पोरकी, कुटुंबावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 11:56 AM2021-10-06T11:56:00+5:302021-10-06T11:57:51+5:30
या मृत व्यक्तीचं नाव मोहम्मद कुर्बान असं आहे. मोहम्मदच्या अचानक मृत्यूनं त्याच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे
नवी दिल्ली – जुनी दिल्ली येथील नबी करीम परिसरात एक हैराण करणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका व्यक्तीच्या मृत्यूचं कारण चक्क एक माकड बनलं आहे. घराच्या छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीवरील झाकण वाऱ्याने उडू नये यासाठी विट ठेवली होती. ही विट माकडाने खाली पाडली तेव्हा गल्लीतून जाणाऱ्या युवकाच्या डोक्यात ती लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात घरमालक ओमप्रकाश याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
या मृत व्यक्तीचं नाव मोहम्मद कुर्बान असं आहे. मोहम्मदच्या अचानक मृत्यूनं त्याच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहम्मद कुर्बान कुटुंबासह नबी करीम येथील मारवाडी वस्तीत राहत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी शमीदा खातून आणि ५ मुलं होतं. या मुलांचे वय १० वर्षापेक्षा कमी आहे. कुर्बान स्कूल बॅग बनवण्याचं काम करत होता. सोमवारी संध्याकाळी ६.१० मिनिटांनी तो किला कदम शरीफ गल्लीतून जात होता. तेव्हा त्याच्या डोक्यावर एक विट पडली. त्यामुळे मोहम्मद तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडला.
स्थानिकांनी मोहम्मदला आरएमएल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. ज्याठिकाणी डॉक्टरांनी मोहम्मदला मृत घोषित केलं. हॉस्पिटलने संबंधित घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस हॉस्पिटलला दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. पोलीस अधिकारी म्हणाले की, घरमालक ओम प्रकाशने दुसऱ्या मजल्यावरील छतावर पाण्याची टाकी ठेवली होती. टाकीचं झाकण वाऱ्याने उडू नये यासाठी त्याने झाकणावर विट ठेवली होती.
माकडाने पाणी पिण्यासाठी टाकीवरील झाकण उचललं तेव्हा त्यावरील विट एकाबाजूला पडली. नेमकं त्याच वेळी खाली गल्लीतून जाणाऱ्या मोहम्मद कुर्बान यांच्या डोक्यावर ती विट आदळली. या दुर्घटनेत मोहम्मदचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोहम्मद कुर्बानच्या पोस्टमोर्टमनंतर त्याचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला आहे. दुर्घटनेवेळी मोहम्मद कुर्बान बॅग बनवण्याचं सामान घेण्यासाठी जात होते. परंतु घरातून बाहेर पडलेला मोहम्मद पुन्हा कधीच घरी परतणार नाही त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे अश्रू अनावर झाले आहेत.