बिहारमध्ये उद्योगांचे स्टार्ट अप नव्हे, तर शटडाऊन !
By Admin | Published: August 7, 2016 01:42 AM2016-08-07T01:42:47+5:302016-08-07T01:42:47+5:30
भारतात सर्वत्र स्टार्टअप इंडियाच्या घोषणा दिल्या जात असल्या तरी बिहारमध्ये अनेक कारखाने बंद पडताना दिसत आहेत. पाटण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर
- एस. पी. सिन्हा, पाटणा
भारतात सर्वत्र स्टार्टअप इंडियाच्या घोषणा दिल्या जात असल्या तरी बिहारमध्ये अनेक कारखाने बंद पडताना दिसत आहेत. पाटण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोकामा औद्योगिक वसाहतीतील दोन मोठे कारखाने गेल्या दोन वर्षांत बंद पडले असून, तिसऱ्या कारखान्यात टाळेबंदी लावण्यात आली असून तोही बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
मोकामा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेला बाटाचा कारखाना २0१४ साली बंद करण्यात आला. चामड्याच्या वस्तुंचा हा कारखाना १९४२ साली सुरू झाला होता आणि त्यात दोन हजारांहून अधिक कामगार काम करीत होते. तिथे २0१४ साली टाळेबंदी लागू करण्यात आली. नंतर हळुहळू कारखान्यातील यंत्रसामग्री अन्यत्र हलविण्यात आली आणि त्यामुळे कामगारांचा रोजगार बंद झाला.
त्यानंतर यावर्षीच युनायटेड स्पिरीटने कारखाना बंद करून टाकला. विजय मल्ल्या यांचे वडिल विठ्ठल मल्ल्या यांनी फार वर्षांपूर्वी तो कारखाना सुरू केला होता. बिहारमध्ये दारूबंदी लागू केल्याने मद्यनिर्मिती करण्याचे आता काही कारण राहिले नाही, असे सांगत युनायटेड स्पिरीटच्या व्यवस्थापनाने कारखाना बंद केला. वास्तविक बिहारमध्ये दारूबंदी असली तरी मद्यनिर्मितीवर राज्य सरकारने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. केवळ कारखान्यात तयार केलेली दारू राज्यात विकू नये, एवढीच अट या कंपनीला घालण्यात आली होती. तरीही व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आणखी अडीच हजार कामगारांच्या नोकऱ्या गेल्या.
नीति आयोगाने भारत वॅगन हा उद्योग तोट्यात चालत असल्याने बंद करण्यात यावा, अशी शिफारस केली आहे. रेल्वेला वॅगन पुरविणारी ही कंपनी असून, पूर्वी भारत हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडचा भाग होती. लालुप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेने हा कारखाना अधिग्रहित केला होता. हा कारखाना तरी वाचवा, अशी येथील कामगारांचीच नव्हे, तर त्यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या अनेकांची मागणी आहे.
याशिवाय राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची सूत गिरणीही बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झाली आहे. त्यामुळे देशात स्टार्टअप आणि बिहारमध्ये शटडाउन असे चित्र निर्माण झाले
आहे.
भारत वॅगनमध्ये दीड वर्षांपासून टाळेबंदी
आता भारत वॅगन कंपनीत कोणत्याही क्षणी टाळेबंदी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या कारखान्यातील उत्पादन गेले दीड वर्षे बंद आहे.
कामगार २७ वर्षांपूर्वीच्या पगारावर आजही काम करीत असून, त्यांनी वेतनवाढीसाठी संप सुरू केला आहे. त्यानंतर ही टाळेबंदी जाहीर झाली.