जतमध्ये खुल्या डाळिंब सौद्यांना प्रारंभ
By admin | Published: December 5, 2015 12:40 AM2015-12-05T00:40:46+5:302015-12-05T00:41:45+5:30
पतंगराव कदम : दुष्काळी उपाययोजनांकडे राज्य शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष
जत : राज्यातील युती शासनाने दुष्काळी जनतेसाठी आजपर्यंत ठोस निर्णय घेऊन काहीच केले नाही. आमच्या कालावधित आघाडी शासनाने घेतलेले निर्णय कायम करून त्यांची अंमलबजावणी करावी, असे आदेश काढले आहेत, अशी माहिती माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी दिली. ते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे डाळिंब सौदा प्रारंभप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
जत तालुक्यात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. याची माहिती घेण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर दौरा केला जाणार आहे, असे सांगून डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, डाळिंब बाजाराचे सौदे खुल्या पद्धतीने होणार आहेत. यातून फसवाफसवी केली जाणार नाही. आठवड्यातून तीनवेळा सौदे केले जातील. याशिवाय शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जाणार आहेत.
जत तालुक्यात बाजार समितीच्या माध्यमातून परिवर्तन झाले आहे. निवडणूक प्रचारात आम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सहा महिन्याच्या आतच केली आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहनशेठ कदम एकत्र बसून बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेत आहेत. भविष्यात उमदी (ता. जत) येथे उपबाजार समिती, जत येथे शीतगृह बांधण्यासठी एकमताने निर्णय घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत म्हणून बाजार समितीने गरज असेल तेथे चारा छावणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, शासनाच्या आदेशाची वाट पाहू नये, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले की, जत बाजार समिती आता स्वयंपूर्ण झाली आहे. पाणी व माती परीक्षण प्रयोगशाळा जत येथे उभारण्यात येणार आहे. भविष्यात डाळिंब बियाणे पॅँकिंग करून ते परदेशात विक्रीसाठी पाठविण्याची व्यवस्था करून शासन शेती व्यवसाय निर्माण केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विक्रम सावंत यावेळी म्हणाले की, शेतकरी व व्यापाऱ्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी बाजार समितीने जत तालुक्यात प्रथमच डाळिंब सौदे सुरू केले आहेत. उमदी येथे उपबाजार समिती निर्माण झाल्यास पूर्व भागातील शेतकऱ्यांची गैरसोय कमी होणार आहे.
यावेळी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, आकाराम मासाळ, पी. एम. पाटील, नामदेव बजबळकर, रायगोंडा बिराजदार सभापती संतोष पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार उमाजी सनमडीकर, आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, मल्लेश कत्ती, पिराप्पा माळी, दिलीप सोलापुरे, नीलेश बामणे, सुजय शिंदे, मीनाक्षी आक्की, नीलाबाई कोळी, श्रीकांत शिंदे, जीवन पाटील, आय. जी. शेख आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
आठवड्यात तीन सौदे
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे डाळिंब सौद्यास शुक्रवारी प्रारंभ झाला. डाळिंब बाजाराचे सौदे खुल्या पद्धतीने होणार आहेत. यातून फसवाफसवी केली जाणार नाही. आठवड्यातून तीनवेळा सौदे केले जातील. याशिवाय शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जाणार आहेत.यामुळे डाळिंब विक्रीला प्रतिसाद मिळणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.