‘कॉल ड्रॉपची भरपाई देणे सुरू करा’
By Admin | Published: January 5, 2016 12:14 AM2016-01-05T00:14:24+5:302016-01-05T00:14:24+5:30
कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारीसंदर्भात ग्राहकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना भरपाई द्यावी, असे लिखित आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)ने दूरसंचार कंपन्यांना दिले
मुंबई : कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारीसंदर्भात ग्राहकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहकांना भरपाई द्यावी, असे लिखित आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)ने दूरसंचार कंपन्यांना दिले असून या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ या पूर्वलक्ष्यीप्रभावापासून करण्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आपण दाद मागितली असून न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची भूमिका घेतल्याने तूर्तास तरी ग्राहकांची डोकेदुखी कायम राहिली आहे. ‘टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन’ या नियमावलीत ट्रायने १६ आॅक्टोबर २०१५ रोजी बदल करत, कॉल ड्रॉप झाल्यास प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश कंपन्यांना दिले. प्रति कॉल ड्रॉप एक रुपया भरपाईचे आदेश असले तरी त्याची कमाल मर्यादा ही दिवसाला तीन कॉलड्रॉपपुरतीच निश्चित केली आहे. यामुळे कितीही कॉल ड्रॉप झाले तरी ग्राहकाला मात्र तीन रुपये एवढीच भरपाई मिळणार आहे. मात्र, तरीही ही भरपाई न देण्याची भूमिका घेत या कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ट्रायच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
कंपन्यांना आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मात्र, न्यायालयाने ट्रायच्या या नियमाला स्थगिती आदेश न दिल्यामुळे कंपन्यांना निकालाची प्रतीक्षा न करता ट्रायच्या निर्णयाची अंमबजावणी करणे क्रमप्राप्त असल्याचे मत विधिज्ञांनी व्यक्त केले.