मोफत गॅस कनेक्शनच्या ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रारंभ
By Admin | Published: May 2, 2016 01:58 AM2016-05-02T01:58:22+5:302016-05-02T01:58:22+5:30
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस)देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे उद्घाटन केले. यापूर्वीच्या
बलिया (उ.प्र.) : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच कोटी एलपीजी कनेक्शन(घरगुती गॅस)देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे उद्घाटन केले. यापूर्वीच्या सरकारांनी गरिबांच्या घरांऐवजी मतपेटींवर लक्ष केंद्रित करीत निव्वळ घोषणा दिल्या होत्या, असा आरोप करतानाच त्यांनी जागतिक कामगारदिनानिमित्त ‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ हा नारा दिला.
कामगारदिनाचे औचित्य साधत त्यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे उज्ज्वला योजनेचा प्रारंभ करताना त्यांनी रालोआ सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देत स्वत:ला कामगार क्रमांक एक असे संबोधले. केवळ मतपेटींवर डोळा ठेवून योजना बनविल्या जातील तोपर्यंत गरिबी संपणार नाही. गरिबांना अधिकार बहाल केल्याने दारिद्र्याशी लढण्याची ताकद मिळेल आणि तेव्हाच गरिबी संपुष्टात येईल. त्यांना शिक्षण, नोकऱ्या, घरे, पिण्याचे पाणी आणि विजेसह संसाधने आणि संधी पुरविल्या जाव्या. आमचे सरकार गरिबांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी काम करीत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गॅस कनेक्शन महिलांच्या नावे
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांच्या नावे मोफत एलपीजी कनेक्शन पुरविले जातील. पहिल्यावर्षी दीड कोटी कनेक्शन दिले जातील. येत्या तीन वर्षांत पाच कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट गाठले जाईल.
स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत केवळ १३ कोटी गॅस कनेक्शन पुरविण्यात आल्याचे सांगत मोदींनी तुलनात्मक लेखाजोखा मांडला. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणतेही रक्कम जमा न करता गरिबांना गॅस कनेक्शन मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘लेबर्स युनाइट द वर्ल्ड’ नवा नारा
जगभरातील कामगारांनी एकजूट व्हावे याऐवजी कामगार जगाला जोडतील(लेबर्स युनाइट द वर्ल्ड) हा नवा नारा देताना ते म्हणाले की, २१ शतकातील बदलत्या परिस्थितीत या मंत्रासोबतच जगाला जोडण्याची गरज आहे.
कामगारांचा घाम हा सर्वात मोठा दुवा ठरावा. कामगारच जगाला एकत्र ठेवू शकतात. कामगारांना एकत्र ठेवण्याचा नारा देणारे लोक जगभरात आपला पाया गमावत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५० वर्षांनंतर शिफारसपूर्ती
उत्तर प्रदेशाने देशाला आठ पंतप्रधान दिले; मात्र या राज्यातील गरिबी का हटली नाही? जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना उत्तर प्रदेशातील घाझीपूरच्या खासदाराने पूर्व उत्तर प्रदेशातील गरिबीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर स्थापन झालेल्या आयोगाने अनेक शिफारशी केल्या. त्या शिफारशींचे काय झाले ते देवालाच माहीत. त्यापैकी एक शिफारस घाझीपूर आणि मऊ या गावांना रेल्वेने जोडण्याची होती. त्यानंतर ५० वर्षे उलटली. आम्ही हा रेल्वेमार्ग उभारत एका शिफारशीची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)