मुख्यमंत्री येताच पाऊस सुरू झाला, गारा पडल्या; कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन पळ काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 11:15 AM2023-04-01T11:15:17+5:302023-04-01T11:15:52+5:30
काँग्रेस कार्यकर्ते ज्या खुर्च्यांवर बसले होते, त्या खुर्च्या डोक्यावर घेऊन निघून गेले. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच झाला.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत विभागीय स्तरावरील कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी शुक्रवारी अजमेरला पोहोचले. मात्र मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचताच जोरदार पाऊस सुरू झाला आणि गारा पडू लागल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते ज्या खुर्च्यांवर बसले होते, त्या खुर्च्या डोक्यावर घेऊन निघून गेले. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच झाला.
कार्यकर्ते जात असल्याचं पाहून काही नेत्यांनी घाईघाईने सभास्थळाच्या गेटवर पोहोचून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते थांबले नाहीत. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील बॅनर, पोस्टरही फाडले. पण, मुसळधार पावसात अशोक गेहलोत यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनीही कौतुक केलं आहे.
कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा पुढे म्हणाले, राजस्थान सरकारने ऐतिहासिक कामे केली आहेत. जनतेला पुन्हा एकदा राजस्थानची सत्ता काँग्रेसच्या हाती सोपवायची आहे. आता जनतेत जाऊन काँग्रेस सरकारचे यश सांगण्याची पाळी काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड, काँग्रेसचे गुजरात प्रभारी रघु शर्मा आणि अन्य नेत्यांनीही संबोधित केले.
कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना गेहलोत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. भाजपाच्या राजवटीत घटनात्मक संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे देशाची घटना आणि लोकशाही आता धोक्यात आली आहे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने अदानींचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यावर सरकारने उत्तर द्यायला हवे होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"