नवउद्योजकांसाठी ‘स्टार्टअप इंडिया’ मोहीम

By admin | Published: January 17, 2016 03:39 AM2016-01-17T03:39:50+5:302016-01-17T03:39:50+5:30

देशात नवउद्योजकांची पिढी घडविण्यासाठी उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि नवविचारांना बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला.

'Startup India' campaign for newcomers | नवउद्योजकांसाठी ‘स्टार्टअप इंडिया’ मोहीम

नवउद्योजकांसाठी ‘स्टार्टअप इंडिया’ मोहीम

Next

नवी दिल्ली : देशात नवउद्योजकांची पिढी घडविण्यासाठी उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि नवविचारांना बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला.
अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींसह देशातील सुमारे १५०० स्टार्टअप प्रमुखांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात करताना केंद्र सरकार या देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या ७० वर्षांत जे घडू शकले नाही ते सर्व आम्ही आता स्टार्टअपच्या बळावर करू शकतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. स्टार्टअपसाठी अनेक योजना आणि सवलती यावेळी त्यांनी जाहीर केल्या.
ते म्हणाले,आमचे विचार वेगळे आहेत. सरकारने हे केले पाहिजे, ते केले पाहिजे अशी बहुतांश लोकांची भावना असते. परंतु सरकारने काय करू नये असा वेगळा विचार मी करीत असतो. आम्ही काय करू नये ते आपणच सांगा, असे आवाहन मोदी यांनी कार्यक्रमाला उपस्थित नवउद्योजकांना केले.
यावेळी मोदी यांनी स्टार्टअप कार्ययोजना सुद्धा जारी केली. धाडसी आणि जोखीम पत्करण्याची तयारी असलेले लोकच यात यशस्वी होऊ शकतात. बँक बॅलन्स बघणारे पुढे जाऊ शकत नाहीत,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवनात आयोजित स्टार्टअपवरील प्रदर्शनही बघितले. याप्रसंगी अर्थमंत्री अरुण जेटली, वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला सीतारमन, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा आदी उपस्थित होते.

काही महत्वाच्या घोषणा...
-स्टार्टअपना आर्थिक मदतीकरिता १०,००० कोटी रुपयांचा निधी.
-स्टार्टअपना पहिली तीन वर्षे आयकर सवलत.
- व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकीला कॅपिटल गेन्स टॅक्स नाही.
-एकच दिवसात स्टार्टअप सुरू करण्यासाठी पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमाने वाटप प्रक्रिया
-स्वप्रमाणनची सुविधा, भारताला स्टार्टअप हब बनविणार
-पेटंट प्रक्रियेचे सुलभीकरण, पेटंट शुल्कात ८० टक्क्यांपर्यत घट
-चार वर्षात दोन हजार कोटी रुपयांचा क्रेडिट गॅरंटी निधी
-सरकारी खरेदीत स्टार्टअपना सवलत
-नवविचारांच्या प्रोत्साहनासाठी ‘अटल अविष्कार योजना’
-५ लाख शाळांमध्ये १० लाख विद्यार्थ्यांसाठी नवविचार कार्यक्रम

(लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: 'Startup India' campaign for newcomers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.