Success Story: १० वी पास विद्यार्थी बनला कोट्यधीश, एकेकाळी 'ऑफीस बॉय'च्या नोकरीतून कमवायचा १५०० रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:50 PM2022-08-09T15:50:18+5:302022-08-09T15:50:55+5:30
दहावीचे शिक्षण सोडून त्यानं ट्रॅक्टर शोरूममध्ये ऑफिस बॉय म्हणून काम केलं. या नोकरीसाठी फक्त १,५०० रुपये दरमहा पगार मिळत होता
दहावीचे शिक्षण सोडून त्यानं ट्रॅक्टर शोरूममध्ये ऑफिस बॉय म्हणून काम केलं. या नोकरीसाठी फक्त १,५०० रुपये दरमहा पगार मिळत होता. पण आता तोच मुलगा स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर वर्षाकाठी १ कोटी रुपये कमवत आहे. ही कहाणी आहे संतोष मंचलाची.
संतोषनं पुढे आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि चांगली नोकरीही मिळवली. मात्र, काही काळ काम केल्यानंतर तो चांगल्या कामाच्या शोधात अमेरिकेला गेला. तिथं त्याचं वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये इतकं झालं आहे. पण संतोषचा यामागचा प्रवास खूप खडतर आहे.
संतोष आता हैदराबादला परतला आहे. त्यानं 'सबका वेलनेसऑन प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी सुरू केली आहे. वजन कमी करण्यासाठी डायट फूड पुरवणारी ही कंपनी आहे. संतोषचा प्रवास तेलंगणातील पेडापल्ली नावाच्या गावातून सुरू झाला. वडिलांचा व्यवसाय बुडीस निघाल्यानं संतोषला पुढील शिक्षण पूर्ण करता आलं नाही. “वेलनेसऑन किचन हे गचिबोवली येथे आहे, जिथं दररोज ३०० ऑर्डर मिळतात. लंच आणि डिनरसाठी जेवणाचा प्लॅन १० हजार रुपये इतका आहे, तर ब्रेकफास्टसह जेवणाचा प्लॅन १२ हजार रुपये आहे", असं संतोष सांगतो.
कसं सुरू झालं संतोषचं करिअर?
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संतोषनं आपली कंपनी सुरू केली. त्यानं आपल्या कंपनीत ७५ लाख रुपये गुंतवले आणि त्याच्या दोन मित्रांनीही ७५ लाख रुपये गुंतवले. संतोषच्या वडिलांचे व्यवसायात 80 लाखांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना आपली मालमत्ताही विकावी लागली होती. त्यामुळेच त्याला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मात्र, संतोषच्या काकांनी त्याला दोन महिन्यांचा संगणक हार्डवेअर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी मदत केली. संतोषनं 2003 मध्ये 50 हजार रुपये गुंतवून सायबर कॅफे सुरू केले, पण तोही व्यवसाय काही फार काळ चालला नाही.
त्याच वेळी सायबर कॅफेमध्ये अपयश आल्यानंतर संतोषने ट्रॅक्टर शोरूममध्ये ऑफिस बॉय म्हणून 1500 रुपये मासिक पगारावर काम करायला सुरुवात केली. पण काही महिन्यांनी ट्रॅक्टरचं शोरूम बंद झालं आणि त्यानं एअरटेलमध्ये फ्रंट ऑफिस असिस्टंट म्हणून काम करण्यात सुरुवात केली. तिथं सहा महिने काम केलं. नंतर त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयात डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून २,५०० रुपये पगारावर काम करायला सुरुवात केली. चार्टर्ड अकाउंटंटनं संतोषला त्याचं शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं आणि त्यानंतर त्यानं मुक्त विद्यापीठात बी.कॉमला प्रवेश घेतला.
संतोष २००७ मध्ये पदवीधर झाला आणि तोपर्यंत त्याचा पगार पाच हजार रुपये झाला होता. याशिवाय संगणक दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगमधूनही तो काही पैसे कमावत होता. पुढे संतोष नोकरीसाठी हैदराबादला गेला. मात्र, कम्युनिकेशन स्किल्स चांगलं नसल्यामुळे त्याला नोकरी मिळू शकली नाही. त्याला इंग्रजीवर काम कर असा सल्ला कोणीतरी दिला. त्यानंतर तो पुन्हा पेडापल्ली गावात परतला आणि त्यानंतर त्यानं एक वर्ष काम केलं. 2008 मध्ये त्याला हैदराबादमधील एका बीपीओमध्ये साडेआठ हजार पगाराची नोकरी मिळाली.
ओरॅकल अॅप्लिकेशन कोर्सनं आयुष्य बदललं
संतोषनं नंतर एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याला बँक ऑफ अमेरिकामध्ये १० हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली. येथे काम करत असतानाच त्यानं ओरॅकल अॅप्लिकेशन्सचा अल्पकालीन कोर्स केला, ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं. २०१३ मध्ये, त्याला सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नोकरी मिळाली, जिथे त्याचा पगार वार्षिक ८.५ लाख रुपये होता. २०१४ मध्ये त्याना ट्रिनिटी कॉर्पोरेशनमध्ये महिन्याला १.२ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आणि तो अमेरिकेलाही गेला. अमेरिकेत त्याला वार्षिक ८५ हजार डॉलर्स पगार मिळत होता. पण काही कालावधीनं त्याची नोकरी गेली.
मात्र, संतोष अमेरिकेतच राहिला आणि त्यानं अनेक ठिकाणी सल्लागाराचं काम केलं. लवकरच अमेरिकेतील वेट वॉचर्स कंपनीनं सप्टेंबर 2017 मध्ये त्याला वार्षिक एक कोटी रुपयांच्या पॅकेजवर ठेवलं. काम करत असताना त्याला थकवा येण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता. तेव्हाच त्यानं आपल्या कंपनीच्या वजन कमी करण्याच्या कार्यक्रमात सामील होण्याचा निर्णय घेतला. डाएट प्लॅन फॉलो केल्यानं त्याचा फायदा होऊ लागला. यातून प्रेरित होऊन त्यां आज स्वतःची कंपनी सुरू केली आहे.