"अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होणार; लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 12:14 AM2020-09-08T00:14:38+5:302020-09-08T07:01:54+5:30
लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल
नवी दिल्ली : मंदीसदृश अर्थव्यवस्थेचे कंबरडे कोरोनामुळे मोडले असतानाच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेची अवस्था आणखी वाईट होईल, असा धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षा अधिक फटका बसेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.
कोरोनामुळे या दोन्ही देशांना खूप मोठा फटका बसला आहे. राजन यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात की, अर्थव्यवस्थेतील काही प्रमुख क्षेत्रांचा जीडीपी जाहीर झाला आहे. अजून काही क्षेत्रांचा जीडीपी जाहीर व्हायचा आहे. तो जाहीर झाल्यावर देशाच्या जीडीपीची अवस्था आणखी बिकट होऊ शकेल. जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जात नाही, तोपर्यंत फारसा खर्च करता येणार नाही, असेही यांनी म्हटले आहे.
कोरोनाकाळात सरकारने केलेली मदत पुरेशी नाही. भविष्यात प्रोत्साहन पॅकेज देण्यासाठी सरकार आज संसाधने वाचवू पाहत आहे. सरकारची ही रणनीती आत्मघाती आहे. कोरोना नियंत्रणात आल्यावर दिलासा देऊ, पॅकेज जाहीर करू, असा विचार सरकार पातळीवर सुरू आहे. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजल्याचे दिसत नाही. या मार्गाने गेल्यास पॅकेज जाहीर होईपर्यंत अर्थव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान झालेले असेल, असे राजन यांनी म्हटले आहे.
सातत्यपूर्ण उपचारांची गरज
राजन यांनी अर्थव्यवस्थेची तुलना रुग्णाशी करून परिस्थितीवर भाष्य केले आहे. अर्थव्यवस्था एखादा रुग्ण असल्याची कल्पना केल्यास त्या रुग्णाला सातत्याने उपचारांची आवश्यकता असते. दिलासा न मिळाल्यास लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल. ते मुलांना शिकवू शकणार नाहीत. मुलांवर काम करण्याची किंवा भीक मागण्याची वेळ येईल. कर्जासाठी लोकांना त्यांच्याकडे असणारे सोने गहाण ठेवावे लागेल. ईएमआय, घरभाडं देणे कठीण होईल. लहान कंपन्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकणार नाहीत. या कंपन्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत जाईल आणि त्या बंद होतील. अशा प्रकारे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवेपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली असेल, असा इशारा राजन यांनी दिला आहे.