राज्य सरकारांनी आर्थिक क्षमतेबाहेर जाऊन मोफत भेटवस्तू वाटू नयेत, राजीव कुमार यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 06:27 AM2022-08-16T06:27:59+5:302022-08-16T06:28:25+5:30
Rajeev Kumar : राजीव कुमार म्हणाले की, मोफत भेटवस्तू देण्याची गरज नाही. आर्थिक अडथळ्यांशी संघर्ष करीत असलेल्या राज्य सरकारांनी असे काम करू नये.
नवी दिल्ली : राज्य सरकारांनी आर्थिक क्षमतेबाहेर जाऊन मोफत भेटवस्तू वाटू नयेत, असे मत निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
राजीव कुमार म्हणाले की, मोफत भेटवस्तू देण्याची गरज नाही. आर्थिक अडथळ्यांशी संघर्ष करीत असलेल्या राज्य सरकारांनी असे काम करू नये. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीची तुलना श्रीलंकेशी केली जाण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अशी कोणतीही तुलना योग्य नाही. श्रीलंका गंभीर आर्थिक परिस्थितीशी झगडत आहे आणि भारत त्यांना आर्थिक मदत देत आहे.
देशात मंदी येण्याची भीती नाही
राज्य सरकारांकडून लोकांना मोफत वस्तू देण्याची प्रवृत्ती म्हणजे रेवडी वाटण्यासारखे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच म्हटले होते. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निती आयोग ही एक निरुपयोगी संस्था असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना कुमार म्हणाले की, राव हे आपले मत मांडण्यासाठी स्वतंत्र आहेत. भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत ते म्हणाले की, देशात मंदी येण्याची कोणतीही भीती नाही.