भाजपच्या बैठकीत फ्री स्टाईल; नेत्यांची एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, रुग्णालयात नेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:57 PM2021-07-16T17:57:08+5:302021-07-16T18:02:05+5:30
भाजप नेत्यांच्या बैठकीत जोरदार हाणामारी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील भाजप महानगर कार्यालयात शुक्रवारी पक्षाच्या प्रदेश कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीला वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यावेळी नेत्यांमध्ये झालेला वाद विकोपाला गेला आणि जोरदार हाणामारी झाली. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात प्रदेश स्तरावरील एक पदाधिकारी जखमी झाला. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी पदाधिकारी पवन गोयल यांचे बंधू संदीप गोयल यांनी प्रशांच चौधरी यांच्या विरोधात सिहानी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
भाजप प्रदेश कार्यकारी समितीची नेहरू नगर येथील महानगर कार्यालयात बैठक होती. कार्यालयात बैठकीसाठी पदाधिकारी जमत होते. प्रदेश कार्यकारणी सदस्य पवन गोयल आणि भाजप नेता शहर विधानसभेबद्दल चर्चा करत होते. तितक्यात बहुजन समाप पक्षातून भाजपमध्ये आलेले पदाधिकारी प्रशांत चौधरी मत व्यक्त करू लागले. संवाद सुरू असताना चौधरी बोलू लागल्यानं गोयल यांनी त्यांना रोखलं. यामुळे वाद झाला.
कार्यालयाच्या बाहेर बघून घेईन अशी धमकी चौधरींनी गोयल यांना दिली. त्यानंतर गोयल बाहेर येताच चौधरींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी गोयल यांचे कपडे फाडले. हा प्रकार पाहून कार्यालयातील पदाधिकारी बाहेर आले. त्यांनी जखमी पवन गोयल यांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं. गोयल यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला राज्यसभेचे खासदार अनिल अग्रवाल, विधान परिषदेचे आमदार दिनेश गोयल, महानगर अध्यक्ष संजीव शर्मा, जिल्हा अध्यक्ष दिनेश सिंघल उपस्थित होते.