पत्रकारांना लाचप्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हा, प्रेस क्लबचा आरोप प्रदेशाध्यक्षांनी फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 04:43 AM2019-05-10T04:43:10+5:302019-05-10T04:43:18+5:30
लेह पोलिसांनी प्रदेश भाजप विरोधात पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. लडाख मतदारसंघात लेहमध्ये मतदानापूर्वी चार दिवस आधी हा प्रकार घडला.
जम्मू : लेह पोलिसांनी प्रदेश भाजप विरोधात पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. लडाख मतदारसंघात लेहमध्ये मतदानापूर्वी चार दिवस आधी हा प्रकार घडला. मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र रैना व आमदार विक्रम रंधावा यांची पत्रकार परिषद २ मे रोजी झाली. ती संपल्यानंतर प्रत्येक पत्रकाराला पाकिट देण्यात आले. त्यात दोन हजार रुपये होते. एका महिला पत्रकाराने त्याबद्दल विचारणा करून ते पाकिट नेत्यांसमोरच टाकून दिले. दुस-या दिवशी लेह प्रेस क्लबने पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली.
लेहच्या निवडणूक अधिकारी अवनी लवासा यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत लेहमध्ये पत्रकारांनी भाजप नेत्यांवर केलेले आरोप खरे असल्याचे दिसून आले. त्या म्हणाल्या की, आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार केली गेली असली तरी असे कृत्य फौजदारी गुन्हा आहे. (वृत्तसंस्था)
म्हणे, ते होते निमंत्रण
रैना व रंधावा यांनी आरोप निराधार असल्याचा दावा केला. त्या पैशांचे चित्रण पत्रकार करू शकले असते. ते म्हणाले की, पाकिटांत पैसे नव्हे, तर संरक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. आपण संबंधित पत्रकारांवर बदनामीचा खटला दाखल करणार आहोत.