राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 02:12 PM2024-05-22T14:12:19+5:302024-05-22T14:12:40+5:30

संजय शर्मा नवी दिल्ली : पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचा आत्मविश्वास आला आहे. ...

State reports, election survey boosts BJP enthusiasm; Claim to form the government for the third time | राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा

राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा

संजय शर्मा

नवी दिल्ली : पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचा आत्मविश्वास आला आहे. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आधीच जल्लोषाचे वातावरण आहे. विजयाचा पूर्ण विश्वास असलेला भाजप नरेंद्र मोदी यांच्या जादुई व्यक्तिमत्त्वामुळे हे शक्य होत असल्याचे सांगत आहे. मतदानाच्या पाच टप्प्यांनंतर भाजपने सर्व राज्यांचे अहवाल, सर्वेक्षण संस्थांचे अहवाल आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मोठ्या विजयाचा दावा केला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांसह पाच टप्प्यांतील मतदानाचा आढावा घेतला. त्याआधारेच भाजपचा मोठा विजय होईल, असा दावा केला जात आहे. मतदान पार पडलेल्या राज्यातील सर्वच नेते आणि उमेदवार दिल्लीत पोहोचू लागले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास दिसत आहे. प्रत्येकाचा असा दावा आहे की, येणार तर मोदीच. सरकार तर भाजपच बनविणार. 

मोदी हॅट्ट्रिक करणार 
पंतप्रधान मोदींच्या जादू आणि करिष्म्यासमोर सर्व समीकरणे फोल ठरत आहेत. नरेंद्र मोदी हॅट्ट्रिक करणार असल्याचा दावा या राज्यातील नेत्यांनी केला आहे. अमित शाह देखील त्यांच्या सभांमध्ये सतत दावा करत आहेत की, एनडीए पाच टप्प्यात ३०० जागा जिंकेल.

तावडेंचा महत्त्वाचा रोल
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या दौरे, निवडणूक सभा, रोड शो, कार्यक्रम आयोजित करण्याचे काम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ हे करत आहेत. बाहेरून भाजपमध्ये दाखल होणाऱ्या नेत्यांना पक्षात घेण्याबाबतचे काम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे करत आहेत. 

कार्यकर्ते व्यवस्थापन...
- अखेरच्या दोन टप्प्यांसाठी भाजपने ११४ जागांवर संघटनेचे एक ज्येष्ठ नेते, एक खासदार, राज्यातील ज्येष्ठ नेते आणि बाहेरून १०० कार्यकर्ते निवडणूक व्यवस्थापनासाठी पाठवले आहेत.
- या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पाठवण्याचे काम भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल भाजपच्या ‘वॉर रूम’मधून करत आहेत.

कुठे नुकसान, कुठे लाभ? 
भाजप नेत्यांच्या अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपचा झेंडा फडकत आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांत नुकसान होऊ शकते, असा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधून याची भरपाई केली जाईल, असे बोलले जात आहे. 
 

Web Title: State reports, election survey boosts BJP enthusiasm; Claim to form the government for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.