रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावरुन हटवला; मणगुत्तीमध्ये शिवप्रेमी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 03:20 PM2020-08-08T15:20:00+5:302020-08-08T15:30:12+5:30
या घटनेनंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कर्नाटक सरकारला वावडे का? असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
बेळगाव – जिल्ह्यातील मणगुत्ती गावात रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. पुतळा बसवण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचा आक्षेप घेत गावातील एका गटाने विरोध केला त्यामुळे तणाव वाढला, त्यानंतर प्रशासन आणि पोलिसांनी रातोरात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.
मणगुत्ती गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता, गेल्या २ वर्षापासून हा पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी चबुतरादेखील तयार केला. या चबुतऱ्यावर गुरुवारी ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. मात्र गावातील काही समाजाच्या लोकांनी याला विरोध केला. त्यांनी छत्रपतींचा पुतळा काढण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे शिवप्रेमी आणि एका गटामध्ये तणाव वाढला, गावातील पुरुष आणि महिला चौथऱ्याजवळ येऊन पुतळ्याला हात लावाल तर याद राखा अशी भूमिका घेतली. तणाव वाढल्याने गावात स्थानिक प्रशासन आणि पोलीस दाखल झाले. गावात ८० टक्क्याहून जास्त मराठी बांधव असल्याने त्यांनी मूर्ती हटवण्यास विरोध केला. पुतळा बसवण्यासाठी पोलीस आणि तहसिलदारांची परवानगी नसल्याचं प्रशासनाने सांगितले. यानंतर ही मूर्ती प्लास्टिकने झाकण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दोन्ही गटांना समोरासमोर बसवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला.
परंतु शिवाजी महाराजांची मूर्ती न काढण्याची भूमिका मराठी समाजाने घेतली. मात्र शुक्रवारी मध्यरात्री गावातील वीज पुरवठा बंद करुन मूर्ती हटवण्यात आल्याने गावकरी संतापले, सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून मूर्ती काढल्याने शिवभक्तांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला आहे. मात्र या घटनेनंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कर्नाटक सरकारला वावडे का? असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
तर सोमवारपर्यंत महाराजांचा पुतळा बसवला नाही तर मणगुत्तीमध्ये जाऊन आंदोलन करु अशा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांनी दिला आहे. कर्नाटक सरकारनं छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारावा अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील असा इशाराच राज्यातील शिवप्रेमींनी दिला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
बाईसाहेब, जरा सबुरीने घ्या; माजी पोलीस अधिकाऱ्याने लिहिलं अमृता फडणवीस यांना खुलं पत्र
“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी