मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये दाखल होणार नरेंद्र मोदींचा पुतळा
By admin | Published: March 16, 2016 05:27 PM2016-03-16T17:27:03+5:302016-03-16T17:51:25+5:30
मादाम तुसाँच्या वॅक्स स्टॅच्यू किंवा मेणाच्या पुतळ्यांच्या म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा दाखल होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 16 - मादाम तुसाँच्या वॅक्स स्टॅच्यू किंवा मेणाच्या पुतळ्यांच्या म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा दाखल होणार आहे. पुढील महिन्यात लंडन, सिंगापूर, हाँगकाँग व बँकॉकमधल्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये मोदींचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
जागतिक राजकारणातलं बडं प्रस्थ असं वर्णन म्युझियमने मोदींचं केलं आहे. नवी दिल्लीमध्ये म्युझियमचे कलाकार मोदींना भेटले आणि मोदींनी त्यांना हवी तसी पोजही दिली असल्याचे वृत्त आहे.
जगातल्या थोर लोकांचे पुतळे या म्युझियममध्ये आहेत, त्यामध्ये मला कसं काय स्थान मिळालं असा प्रश्न मोदींनी म्युझियमच्या संचालकांना विचारला होता. परंतु ज्यावेळी लोकांच्या पसंतीतून ही निवड करण्यात आल्याचे समजल्यावर मला दिलासा मिळाल्याची भावना मोदींनी म्युझियमला लिहिलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
मादाम तुसाँच्या कलाकारांचं कौशल्य, व्यावसायिकपणा आणि कामावरील निष्ठा मनाला भिडल्याचे मोदींनी म्हटले आहे. मोदींची ओळख बनलेल्या कुर्त्यामध्येच त्यांनी या पुतळ्यासाठी पोज दिली आहे. पारपंरिक नमस्ते करताना मोदी या पुतळ्यामध्ये दिसणार आहेत.
टाइम मॅगेझिनच्या टॉप टेन पर्सन्समध्ये मोदी असून जागतिक बाजारात ते अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असल्याचेही म्युझियमने म्हटले आहे. मोदींचे पुतळे बनवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागल्याचे व दीड लाख ब्रिटिश पौंड खर्च आल्याचेही म्युझियमच्या वतीने सांगण्यात आले आहे.