घराबाहेर जाळला रजनीकांत यांचा पुतळा
By admin | Published: May 22, 2017 02:28 PM2017-05-22T14:28:53+5:302017-05-22T15:26:06+5:30
तामिळनाडूच्या एका गटानं रजनीकांत यांच्या घराबाहेर त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला आहे.
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 22 - दक्षिणेतले सुपरस्टार रजनीकांत लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र कोणत्या पक्षात जाणार हे अद्यापही त्यांनी ठरवलं नाही. मात्र ते भाजपामध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर तामिळनाडूच्या एका गटानं रजनीकांत यांच्या घराबाहेर त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला आहे.
रजनीकांत यांनी राजकारणात येऊ नये म्हणून चेन्नईमधल्या त्यांच्या घराच्या बाहेर काही जणांनी विरोध प्रदर्शनही केलं आहे. त्याचं म्हणणं आहे की, रजनीकांत कन्नड आहेत, त्यामुळे त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणापासून दूर राहावं. तत्पूर्वी टीएमके(तमीळ मनीला काँग्रेस)नं रजनीकांत यांना राजकारणात येण्यापासून विरोध केला होता. रजनीकांत हे कर्नाटकचे असून, त्यांनी तामिळनाडूमधून निवडणूक का लढवावी. त्यानंतर रजनीकांत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी पूर्णतः तमीळ आहे. गेल्या 40 वर्षांपासून मी तामिळनाडूत राहतोय. गेल्या काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.
रजनीकांत यांच्या दक्षिणेतील कमालीच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे भाकीत वारंवार वर्तवण्यात येत असते. त्याच पार्श्वभूमीवर रजनीकांत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचीही चर्चा होती. गेल्या आठवड्यात चाहत्यांशी संवाद साधताना रजनीकांत यांनी त्यांना मोठ्या लढ्यास तयार राहण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन रजनी यांच्या राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याचे संकेत मानले जात आहे. मी पक्का तामिळीच आहे. जर तामिळी लोकांनी स्वीकारले नाही तर मी थेट हिमालयात जाईन, असे रजनीकांत यांनी म्हटले होते.