शिवरायांच्या पुतळ्याची मणगुत्तीत होणार पुनर्स्थापना; अखेर कर्नाटक सरकार झुकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 02:14 AM2020-08-10T02:14:27+5:302020-08-10T06:49:27+5:30
बैठकीत निर्णय; कर्नाटक सरकारबद्दल रोष कायम
बेळगाव : आठ दिवसांत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुतळा हटविल्याने निर्माण झालेला तणाव अद्याप कायम असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मणगुत्ती येथे उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर बुधवारी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याला गावातील एका गटाचा विरोध होता. शुक्रवारी रात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली होती. सीमाभागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पत्र पाठवून शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याची मागणी केली होती. रविवारी महाराष्टÑातही ठिकठिकाणी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. रविवारी सकाळी अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि हुक्केरीचे तहसीलदार व गावातील पंचांची बैठक झाली. त्यात आठ दिवसांत पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय झाला. दुपारनंतर बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनीदेखील मणगुत्ती गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांमध्ये मात्र रोष कायम आहे.