'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला खरंच तडे गेलेत? वाचा व्हायरल फोटोची सत्यकथा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 02:50 PM2018-12-05T14:50:55+5:302018-12-05T15:51:53+5:30
सोशल मीडियावर काही दिवसांपासून सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
नवी दिल्ली - गुजरातच्या नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या पोटोवर काही पांढऱ्या रेषा दर्शविण्यात येत असून केवळ 15 दिवसांतच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला तडे गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, सोशल मीडियावर करण्यात आलेला हा दावा खोटा आहे. कारण, याबाबत स्टॅच्यू ऑफ युनिटीचे सीईओ आय के पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सोशल मीडियावर काही दिवसांपासून सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे ते फोटो व्हायरल होताना, मोदी सरकारला टार्गेट करण्यात येत आहे. तसेच 3 हजार कोटी रुपये खर्च करुनही केवळ 15 दिवसांत मूर्तीला तडे गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सोशल मीडियावरील हा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे. एका खासगी वेबसाईटने त्यांच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या व्हिडीओचे क्लोजअप शॉट दिले आहेत. त्यामध्ये या मूर्तीवरील पांढरे चिन्ह स्पष्टपणे दिसून येतात. मात्र, मूर्तीवरील हे पांढरे चिन्ह त्याच जागेवर आहे, जेथे या मूर्तीला जोड (block) देण्यात आला आहे. तर आजतक या वृत्तवाहिनीनेही 0.21 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये याबाबत माहिती दिली आहे. त्यामध्येही मूर्तीवरील या पांढऱ्या रेषा दिसून येतात. विशेष म्हणजे हा व्हिडीओ स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या उद्घाटनादिवशीचा आहे. त्यामुळे 15 दिवसांनी मूर्तीला तडे गेल्याने या रेषा दिसत असल्याचे म्हणणे खोटे आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीचे सीईओ आय के पटेल यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या मूर्तीमध्ये कास्यमिश्र धातूच्या हजारो प्लेट्स आहेत. ज्या प्लेट्सची जोडणी वेल्डींगद्वारे करण्यात आली आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या वेल्डींगचा वापर करण्यात आला. त्यामुळे या पांढऱ्या रेषा म्हणजे मूर्तीला तडे गेल्याचा भ्रम होतो, असे पटेल यांनी सांगितले. तसेच मूर्तीला तडा गेल्याचा दावा खोटा असल्याचेही पटले यांनी म्हटले.