गुन्हे शाखेसाठी अतिरिक्त आयुक्त मिळेना ठाण्यातील स्थिती : सहा महिन्यांपासून खुर्ची रिकामी
By admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:57+5:302015-02-14T23:50:57+5:30
पंकज रोडेकर
Next
प कज रोडेकरठाणे : शहर पोलीस दलातील अति महत्त्वाचे समजले जाणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. त्यातच नागरिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने गुन्हेगारीतही वाढ होत असून गुन्हे शाखेच्या एका युनिटच्या वरिष्ठ अधिकार्यांसह तीन पोलिसांना लाच घेताना अटक झाल्याने गुन्हे शाखेवर नागरिकांनी विश्वास का ठेवावा, असा प्रश्न ठाणेकरांना पडू लागला आहे.२०१४ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची बदली झाली. त्या जागी डॉ. रवींद्र सिंघल हे अतिरिक्त आयुक्त म्हणून ठाण्यात आले. मात्र, ४ महिन्यांनंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात त्यांची मध्य रेल्वेच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. सध्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शिवाजी बोडखे यांच्याकडे त्यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. राज्यात युतीचे सरकार येऊन १०० दिवसांपेक्षा जास्त काळ झाल्यानंतरही ठाण्यासारख्या आयुक्तालयाला अतिरिक्त पोलीस आयुक्त मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरात सोनसाखळी चोरी आणि छेडछाडीचेही प्रकार वाढल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तत्कालीन अधिकारी भारंबे यांनी सोनसाखळी चोरट्यांवर वचक बसविण्यासाठी मोक्कांतर्गत कारवाईकेली होती. त्यानंतर, आलेल्या डॉ. सिंघल यांनी सोनसाखळीच्या घटनांचा अभ्यास करून पोलिसांनी थेट नागरिकांनी संवाद साधून कशी खबरदारी घ्यावी, तसेच या घटना रोखण्यासाठी पथनाट्याद्वारे ठाणेकरांमध्ये जगजागृती केली. तसेच फेसबुक या सोशल मीडियाची मदत घेतली होती. मात्र, ते गेल्यानंतर हे बंद झाले. याचदरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या वरिष्ठ अधिकार्यांसह तीन पोलीस शिपायांना हजारो रुपयांची लाच घेताना पकडले आहे. या रिक्त पदाबाबतचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी गृहविभागाकडे पाठविला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. (प्रतिनिधी)....................प्रथमच पद रिक्तठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २०१० साली अतिरिक्त पोलीस आयुक्त हे पद निर्माण झाले. तेव्हापासून २०१४ पर्यंत हे पद कधीच रिक्त नव्हते. अशोक धिवरे हे पहिले अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून ठाण्याला लाभले. त्यानंतर, एस.ए. कक्कड, एस.ए. पाण्डेय, प्रशांत बुरडे, धनंजय कमलाकर, मिलिंद भारंबे आणि डॉ. रवींद्र सिंघल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची धुरा सांभाळली. प्रत्येकाने आपल्या कालावधीत वेगवेगळ्या उपाययोजना राबवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला.