प्रसिद्धीपासून दूर राहा, ती नशा तुम्हाला संकटात टाकेल; नव्या खासदारांना मोदींचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 07:36 PM2019-05-25T19:36:01+5:302019-05-25T19:39:50+5:30
जनता आणि स्वत: यामध्ये अंतर ठेऊ नका. अहंकारापासून दूर ठेवा असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नव्या चेहऱ्यांना खासदारकीची संधी मिळाली. लोकसभेत पहिल्यांदा खासदार झालेल्यांनी प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहा. लालकृष्ण अडवाणी नेहमी सांगायचे की, छापणे आणि दिसणे यापासून लांब राहिला तर ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे. त्यामुळे टीव्हीवर दिसणे आणि पेपरमध्ये छापून येणं दूर ठेवा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन खासदारांना दिला आहे.
अनेक प्रस्थापितांना पराभूत करुन तुम्ही आला आहात त्याचा घमंड ठेवू नका, तुम्ही मोदींमुळे निवडून आला नाही तर जनतेच्या आदेशामुळे निवडून आला आहे. जनतेच्या मतांचे सन्मान करा. जनता आणि स्वत: यामध्ये अंतर ठेऊ नका. अहंकारापासून दूर ठेवा असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.
शिफारशींवर कर्मचारी नेमू नका
दिल्लीत अशी व्यवस्था आहे जी तुम्हाला बर्बाद करेल. तुमचं काम करण्यासाठी तुमच्या मतदारसंघातील योग्य उमेदवाराला संधी द्या. जुन्या खासदारांनी केलेल्या शिफारशींची माणसं भरु नका. तुमचा विश्वास ज्या माणसांवर आहे त्या माणसाला जबाबदारी द्या असंही नरेंद्र मोदींनी सांगितले. सामान्य माणसांशी तुम्ही नातं जोडा. मनोहर पर्रिकर यांनी आयुष्यभर हेच केलं. व्हीआयपी कल्चरपासून जितकं लांब राहता येईल राहा.
माध्यमातील अफवांवर विश्वास ठेऊ नका
अजून कोण निवडून आलं आहे, कोण पडलं आहे याची यादी माझ्याकडे आली नाही. पण देशात अनेक नरेंद्र मोदी जन्माला आले, त्यांनी मंत्रिमंडळ पण जाहीर केलं. ज्या लोकांची नावं चर्चेत आहेत त्यांना स्वप्न पडली आहेत. मला कोणतं खातं मिळणार याची लालसा बाळगू नका, सरकारमध्ये कोण मंत्री होणार हे मिडीया ठरवणार नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्यांची नावं आहेत त्यांनी सांगा माझं नावं काढून टाका. ज्यांना मंत्रिमंडळ बनविण्याचा अधिकार आहे तेच हे काम करतील तुम्ही करु नका असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा नेत्यांना लगावला.
#WATCH PM Narendra Modi says, "Desh mein bahot aise Narendra Modi paida ho gaye hain jinhone mantri mandal bana diya hai. Sabka total lagayenge to shayad 50 MP reh jayenge jo mantri ki list mein nahi ayenge." pic.twitter.com/fywCeDGEzi
— ANI (@ANI) May 25, 2019
गांधी, दिनदयाळ, लोहिया यांच्या विचारांवर चला
महात्मा गांधी, पंडीत दिनदयाळ उपाध्यय, राममनोहर लोहिया या तीन महापुरुषांचे विचार घेऊन पुढे चला, हे विचार तुम्हाला पुढे आणतील. आज राजकारणात या तीन विचारधारेची माणसं वर्चस्व करतात. मग ती माणसं दुसऱ्या राजकीय पक्षातही का असेना. पण या महापुरुषांचे विचार त्यांना प्रगल्भ करतात.
बाबासाहेबांनी तपस्या करुन केलेलं संविधान सर्वोच्च
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे त्याच्या कसोटीत राहून काम केलं तर कोणत्याही संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. संविधानाची साक्ष ठेऊन संकल्प करा, या देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम करुन त्यांना समाजात पुढे आणण्याचं काम करा. समाजातील जातीभेद दूर करा. सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. सबका साथ, सबका विकास आणि आता सबका विश्वास हा आपला मंत्र आहे.