बाबा रामदेव यांच्यावर आधारित पुस्तकाच्या विक्रीला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 09:45 AM2017-08-12T09:45:41+5:302017-08-12T11:44:08+5:30

योगगुरु बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित 'गॉडमॅन टू टायकून : द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव' या पुस्तकाच्या विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे

A stay on the sale of a book based on Baba Ramdev | बाबा रामदेव यांच्यावर आधारित पुस्तकाच्या विक्रीला स्थगिती

बाबा रामदेव यांच्यावर आधारित पुस्तकाच्या विक्रीला स्थगिती

Next

मुंबई, दि. 12 - योगगुरु बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित 'गॉडमॅन टू टायकून : द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव' या पुस्तकाच्या विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. दिल्लीमधील न्यायालयाकडून ही स्थगिती आणण्यात आली आहे. जगरनॉट बुक्सने न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने प्रकाशक किंवा लेखकाची बाजू ऐकून न घेताच बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीला स्थगिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

10 ऑगस्ट रोजी आपल्याला हा निर्णय कळवण्यात आला असून, लवकरच निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहोत अशी माहिती प्रकाशकाने दिली आहे. प्रियांका पाठक नारायण यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी मुंबई मिररशी बोलताना दिली आहे. 'बाबा रामदेव यांच्यावर आधारित याआधी कोणतंच पुस्तक लिहण्यात आलं नसल्याने आम्हाला अशा प्रकारच्या स्थगितीची काहीच कल्पना नव्हती', असं प्रियांका यांनी सांगितलं आहे. 

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'पुस्तक लिहित असताना मी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची भेट घेतली होती. त्यांची भेट घेताना ते एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच भेटले. या पुस्तकात त्यांच्या जन्मापासून ते एका आयुर्वैदिक कंपनी सुरु करण्यापासूनचा यशस्वी प्रवास उलगडण्यात आला आहे. हरियाणामध्ये जन्म घेण्यापासून ते एक यशस्वी व्यवसायिक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सांगण्यात आला आहे. यामध्ये त्यांचे सहकारी बाळकृष्ण तसंच इतरांबद्दलही सांगण्यात आलं आहे'. 

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीदेखील प्रकाशकाची बाजू घेत स्वतंत्रतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. न्यायलयाच्या निर्णयाविरोधात वरील न्यायालयात दाद मागण्याच्या निर्णयावर प्रकाशक विचार करत आहेत. दरम्यान बाबा रामदेव यांच्याकडून यासंबंधी कोणती प्रतिक्रिया मिळालेली नाही.
 

Web Title: A stay on the sale of a book based on Baba Ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.