आमच्या अंतर्गत विषयांपासून दूर रहा, भारताने पाकिस्तानला सुनावले
By admin | Published: July 12, 2016 07:49 AM2016-07-12T07:49:14+5:302016-07-12T07:49:14+5:30
काश्मीरमधल्या स्फोटक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या मुद्यावरुन राजकारण सुरु केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - काश्मीरमधल्या स्फोटक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या मुद्यावरुन राजकारण सुरु केले आहे. बुरहान वानीच्या मृत्यूने आपल्याला धक्का बसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.
एवढयावरच न थांबता सोमवारी संध्याकाळी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझीझ चौधरी यांनी भारताचे राजदूत गौतम बामबावले यांना बोलवून काश्मीरमधल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. बुरहान वानीच्या मृत्यूची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे.
पाकिस्तानच्या या कृतीला भारतानेही तितक्याच कठोर शब्दात सडेतोड उत्तर दिले आहे. काश्मीर भारताचा अंतर्गत विषय असून, पाकिस्तानने त्यात ढवळाढवळ करु नये असे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या विधानांवरुन आजही त्यांची दहशतवादाला साथ असून ते एक धोरण म्हणून दहशतवादाचा वापर करताना दिसतात असे भारताने म्हटले आहे.
बुरहान वानी हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता. शुक्रवारी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला. त्यानंतर काश्मीर खो-यात हिंसाचार उसळला असून, आतापर्यंत या हिंसाचारात २५ पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत. पाकिस्तानसाठी बुरहान वानी दहशतवादी नसून काश्मीरी नेता होता.