पोलाद मंत्री वीरेंद्र सिंह यांचा मंत्रिमंडळाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:16 AM2019-04-15T04:16:31+5:302019-04-15T04:17:14+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन पोलाद मंत्री विरेंद्र सिंह यांनी हरियाणाच्या हिसार लोकसभा मतदारसंघातून मुलगा बृजेंद्र सिंह याची उमेदवारी मिळविली.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन पोलाद मंत्री विरेंद्र सिंह यांनी हरियाणाच्या हिसार लोकसभा मतदारसंघातून मुलगा बृजेंद्र सिंह याची उमेदवारी मिळविली. भाजपने रविवारी सहा उमेदवारांची नावे जाहीर केली.
भाजपच्या स्थानिक उमेदवारांकडून पुत्र बृजेंद्र सिंह याच्या उमेदवारीसाठी होणारा विरोध लक्षात घेउन पोलादमंत्री विरेंद्रसिंह यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा भाजपचे संघटनमंत्री रामलाल यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर बृजेंद्रसिंह यांना हिसार मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. ते हरियाणा केडरची १९९८ बॅचचे सेवेत असलेले आयएएस अधिकारी आहेत. त्यांना राजकारणात आणण्यासाठी प्रदीर्घ काळापासून विरेंद्रसिंह प्रयत्नशील होते. या मतदारसंघातून भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुभाष बराला आणि राज्यातील मंत्री कॅप्टन अभिमन्यू यांनीही उमेदवारी मागितली होती. मुलाला तिकिट मिळाल्यामुळे आपण राज्यसभेचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा देत असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांना विरेंद्रसिंह यांनी कळविले आहे. यातून आपण एक चांगला संदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रोहतकमधून अरविंद शर्मा, राजस्थानच्या दौसा येथून जसकौर मीणा, मध्य प्रदेशातील खजुराहो येथून विष्णुदत्त शर्मा, रतलाम येथून जी. एस. दामोर आणि धार येथून छत्तर सिंह दरबार यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे.