काश्मीरमधील परिस्थिती निवळण्यासाठी सरकारकडून हालचाली, उचलणार हे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 08:56 AM2019-08-25T08:56:07+5:302019-08-25T08:56:44+5:30
कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, काश्मीरमधील परिस्थिती निवळण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नजरकैदेत असलेल्या ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या स्थानिक काश्मिरी नेत्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू करण्यात आले आहेत. त्याबरोबरच काश्मीरप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलावून तेथील परिस्थितीची माहिती देण्याचा विचारही सरकराने सुरू केला आहे. सध्या परदेश दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी मायदेशात परतल्यानंतर होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो.
5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून काश्मीर खोऱ्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तेव्हापासून खोऱ्यात संचारबंदीसारखी परिस्थिती आहे. दरम्यान, 15 ऑगस्टपासून खोऱ्यातील परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रीनगरमध्ये नजरकैदेत असणाऱ्या काही बड्या नेत्यांशी संपर्क साधला आहे. ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार या नेत्यांची सुटका करण्याच्या प्रक्रियेलाही गती आली आहे. सरकार त्यासाठी अन्य विरोधी नेत्यांना विश्वासात घेणार असून, त्यासाठी दिल्ली किंवा श्रीनगरमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याची ग्वाही सरकार आणि विरोधी पक्षांनी मिळून जगाला द्यावी, अशी सरकारची अपेक्षा आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी शनिवारी दुपारी श्रीनगर विमानतळारूनच दिल्लीला पाठविले. काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी व स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी हे नेते निघाले होते.
काश्मीरमध्ये सारे आलबेल आहे, असे केंद्र सरकार सांगत असले, तरी परिस्थिती चांगली नाही आणि म्हणूनच आम्हाला श्रीनगरमध्ये मज्जाव केला, अशी टीका राहुल गांधी यांनी दिल्लीत केली. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, काश्मीरमधील स्थिती अतिशय वाईट आहे, असे आम्हाला विमानातील प्रवाशांनीच सांगितले, पण केंद्र सरकार हे देशातील जनतेपासून लपवू पाहत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांची ही गळचेपी असल्याचा आरोप सीताराम येचुरी यांनी केला.