स्टीफन हॉकिंगदेखील मानत होते आइन्स्टाइनच्या सिद्धांतापेक्षा वेद आहेत श्रेष्ठ, भाजपा मंत्री हर्षवर्धन यांचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 08:25 AM2018-03-17T08:25:19+5:302018-03-17T09:04:47+5:30
जगाचा निरोप घेतलेल्या स्टीफन हॉकिंग यांच्यासंदर्भात मोदी सरकारमधील मंत्री हर्षवर्धन यांनी विचित्र विधान केले आहे.
इम्फाळ : विश्वाची उत्पत्ती, कृष्णविवरांसंदर्भात मांडलेले सिद्धान्त व दुर्धर आजारावर मात करून विश्वासाठी संशोधनाचा यज्ञ अखंड चालू ठेवणारे जगप्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी बुधवारी (14 मार्च) केंब्रिज येथे अखेरचा श्वास घेतला आणि ब्रह्मांडच पोरके झाले. जगाचा निरोप घेतलेल्या स्टीफन हॉकिंग यांच्यासंदर्भात मोदी सरकारमधील मंत्री हर्षवर्धन यांनी विचित्र विधान केले आहे. ''अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या E=mc² सापेक्षताच्या सिद्धांताच्या तुलनेत वेदांमधील सूत्रं श्रेष्ठ असू शकतात, असे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी म्हटले होते'', असा अजब गजब दावा हर्षवर्धन यांनी शुक्रवारी केला आहे.
मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये 105 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये संबोधित करताना हर्षवर्धन यांनी हा दावा केला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी या माहितीसंबंधी जोडले गेलेल्या स्त्रोतांबाबतचे प्रश्न टाळले
नेमके काय म्हणाले हर्षवर्धन?
''आपण एका प्रख्यात शास्त्रज्ञ आणि ब्रह्मांड विज्ञानी स्टीफन हॉकिंग यांना गमावलं आहे. वेदांमध्ये सूत्रं आइन्स्टाइन यांच्या E=mc² सिद्धांतापेक्षाही श्रेष्ठ असू शकतात, असे हॉकिंग यांनी ऑन रेकॉर्ड म्हटले आहे.'' विशेष म्हणजे हर्षवर्धन यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला आणि मुख्यमंत्री एन. वीरेन सिंहदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.
पुराव्याची करण्यात आली मागणी
दरम्यान, हर्षवर्धन यांनी केलेल्या दाव्याचा पुरावा मागण्यात आला तेव्हा त्यांनी, तुम्ही याबाबतचे स्त्रोत शोधा. वेदांमधील सूत्रं आइन्स्टाइन यांच्या सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ असू शकतात, असे स्टीफन यांनी म्हटल्याचा रेकॉर्ड आहे. तुम्ही लोकांनीही यावर थोडं संशोधन करावं. मात्र, स्टीफन हॉकिंग यांनी भारतीय वेदांसंबंधी कोणतेही विधान केलेल्याचा ठोस पुरावा आढळलेला नाही. स्टीफन हॉकिंग आणि भारतीय वेद यासंबंधी गुगलवर माहिती शोधण्यात आली त्यावेळेस ब-याच लिंक समोर आल्या. यावेळी Institute of Scientific Research on Vedas ही लिंकदेखील पर्यायांमध्ये समोर आली. यात डॉ. शिवरामबाबू यांनी लिहिलेल्या वैदिक आणि वैज्ञानिक पुस्तकासंदर्भात स्टीफन हॉकिंग यांनी सांगितले होते की, यामध्ये एखादा असे सूत्र असू शकते जो आइन्स्टाइन यांच्या सिद्धांतापेक्षा चांगले असेल''.
We recently lost a renowned scientist, cosmologist #StephenHawking. He emphatically said on record that our Vedas might have a theory superior to that of Einstein’s E=mc2: Dr.Harsh Vardhan, Union Science and Technology Minister pic.twitter.com/N9ustXvSnu
— ANI (@ANI) March 16, 2018