अजून तरी मी ‘माजी’ वित्तमंत्री नाही, सिन्हा, चिदंबरम यांच्यावर जेटलींनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 10:37 PM2017-09-28T22:37:43+5:302017-09-29T00:22:30+5:30

माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच नाव न घेता का होईना मार्मिक उत्तर दिले.

Still, I am not a former finance minister, Mr. Sinha, Chidambaram, Jaitley has taken the lead | अजून तरी मी ‘माजी’ वित्तमंत्री नाही, सिन्हा, चिदंबरम यांच्यावर जेटलींनी साधला निशाणा

अजून तरी मी ‘माजी’ वित्तमंत्री नाही, सिन्हा, चिदंबरम यांच्यावर जेटलींनी साधला निशाणा

Next

नवी दिल्ली - माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच नाव न घेता का होईना मार्मिक उत्तर दिले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना जेटली यांनी सिन्हा यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या सुरात सूर मिळवून सरकारवर हल्लाबोल करणारे दुसरे माजी वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनाही टोमणे मारले.

धोरणांवर बोलण्याऐवजी व्यक्तिकेंद्रित टीका करणारे सिन्हा आज वयाच्या 80व्या वर्षीही मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत व पूर्वी एकमेकांवर तुटून पडणारे सिन्हा व चिदंबरम आज ते विसरून एका सुरात बोलत आहेत, असा जेटली यांच्या अप्रत्यक्ष टीकेचा आशय होता. त्यांच्यासारखा मी अजून तरी ‘माजी’ वित्तमंत्री झालेलो नाही व त्यामुळे मला त्यांच्यासारखे बोलण्याची मोकळीक नाही, असे जेटली म्हणाले.

कोणाचेही नाव न घेता परंतु टोला नेमका कोणाला आहे हे स्पष्ट होईल अशा चतुराईने जेटली म्हणाले,‘ मीही त्यांच्यासारखा माजी वित्तमंत्री असतो तर (संपुआ-2च्या काळातील) ‘धोरण लकवा’ मलाही सोईस्करपणे विसरता आला असता. 1998 ते 2002 दरम्यानची बँकांची 15 टक्के बुडित कर्जे ही माझ्या विस्मृतीत गेली असती. 1991मध्ये वारसा म्हणून मिळालेली चार अब्ज डॉलरची चलन गंगाजळीही माझ्या लक्षात राहिली नसती.’! पूर्वी परस्परांवर तुटून पडणा-यांनी आता सुरात सूर मिळविला म्हणून त्याने वस्तुस्थिती बदलत नाही, असेही ते म्हणाले.



सन 1999मध्ये संसदेत बोफोर्स प्रकरणावर बोलण्याच्या वेळी कोणावरही व्यक्तिगत टीका न करण्याचा सूज्ञ सल्ला ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्याला दिला होता. याचे स्मरण देत जेटली म्हणाले की, व्यक्तींना लक्ष्य केल्यावर मुद्द्यांना बगल देणे सोपे जाते. जेटली म्हणाले की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे वित्तमंत्री म्हणून माझे गुणवान पूर्वसुरी आहेत आणि इतर पूर्वसुरी (सिन्हा व चिदंबरम) गळ्यात गळे घालणारे आहेत!



80व्या वर्षीही इच्छुक!
ज्या पुस्तकाचे प्रकाशन होते त्याचे शीर्षक ‘इंडिया@ 70 मोदी@ 3.5’ असे होते. सरकारमध्ये स्थान मिळाले नाही म्हणून नाराज झालेले सिन्हा आज वयाच्या 80व्या वर्षीही पदासाठी हपापलेले आहेत, असे अप्रत्यक्षपणे सुचवत जेटली म्हणाले की, खरे तर या पुस्तकाचे शीर्षक ‘इंडिया@ 70 मोदी@ 3.5 अ‍ॅण्ड ए जॉब अ‍ॅप्लिकंट @ 80’ असे हवे होते.



Web Title: Still, I am not a former finance minister, Mr. Sinha, Chidambaram, Jaitley has taken the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.