नगरसेवक म्हणून उभे राहण्यासाठी ८० लाख! आपने तिकिटे विकल्याचा आरोप; स्टिंगमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:16 AM2022-11-22T09:16:44+5:302022-11-22T09:18:06+5:30
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत कथित स्टिंग व्हिडीओ प्रसारित करून आप व या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारात खोलवर गुंतले असल्याचा आरोप केला.
नवी दिल्ली : भाजपने सोमवारी एक ‘स्टिंग व्हिडीओ’ प्रसारित करत आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीसाठी तिकिटे विकल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. वायव्य दिल्लीच्या रोहिणी भागातील ‘आप’च्या एका माजी कार्यकर्तीने कथितरीत्या हा व्हिडीओ चित्रित केला आहे. दुसरीकडे ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांनी हा स्टिंग व्हिडीओ ‘फेक’ असल्याचे सांगत आरोप धुडकावून लावले.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत कथित स्टिंग व्हिडीओ प्रसारित करून आप व या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारात खोलवर गुंतले असल्याचा आरोप केला. ‘आप’च्या माजी कार्यकर्त्या बिंदू यांनी हा व्हिडीओ चित्रीत केला आहे. बिंदू एमसीडी निवडणूक रोहिणी डी प्रभागातून ‘आप’च्या तिकिटावर लढवू इच्छित होत्या. त्या तिकीट मागण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांच्याकडे ८० लाख रुपयांची मागणी करण्यात आली,
‘आप’चे प्रत्युत्तर
‘भाजप’च्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, ‘आप’चे दिलीप पांडे म्हणाले की, एमसीडी निवडणुकीसाठी पक्षाच्या तिकिटांना खूप मागणी होती. ‘अनेक दलाल सक्रिय झाले. दलाल सक्रिय झाले तरी पैशाच्या जोरावर तिकीट दिले गेले नाही. भाजपने काहीही केले नाही. ‘आप’ म्हणजे भाजप किंवा काँग्रेस नाही, जिथे पैसे देणाऱ्यांना तिकिटे वाटली जातात. भाजप दररोज आणत असलेल्या खोट्या स्टिंग ऑपरेशन्सवरून असे दिसून येते की, तो पक्ष निवडणुकीत अत्यंत वाईट पद्धतीने मात खाणार आहे,’ असेही ते म्हणाले. आप नेत्यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून श्रीमंतांना तिकिटे वाटली, असा आरोप बिंदू यांनी केला.
सगळेच सामील
‘आप’ने तिकिटे विकली. मी खूप विचार करून हे स्टिंग केले. हे काही ठरावीक नेत्यांचे काम नाही. यात सर्वच सामील आहेत. खालपासून वरपर्यंत. मी दुर्गेश पाठक यांच्याकडे तक्रार करून काहीही झाले नाही. मला ८० लाखांची मागणी करण्यात आली.
- बिंदू, आपची माजी कार्यकर्ती
चौकशीची मागणी
रोहिणीतील भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांनी २०२०च्या विधानसभा निवडणुकीतही आप नेत्यांनी तिकिटेही विकल्याचा आरोप करून याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली. दिल्लीत एमसीडीच्या निवडणुका ४ डिसेंबरला होणार आहेत.