केमिकलमध्ये सापडला बालकाचा मृतदेह; पार्सलवर नवी मुंबईचा पत्ता, लखनऊ विमानतळावर खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 03:46 PM2024-12-03T15:46:34+5:302024-12-03T15:58:52+5:30
लखनऊ विमानतळावर प्लास्टिकच्या डब्ब्यामध्ये १ महिन्याच्या बाळाचा मृतदेह आढळल्याने घबराट पसरली आहे.
Lucknow Airport : लखनऊच्या चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचारी मंगळवारी सकाळी सामानाच्या स्कॅनिंग दरम्यान संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर चक्रावून गेले. कर्मचाऱ्यांना सामानाच्या तपासणीदरम्यान, एक डब्बा सापडला होता. डब्बा उघडला असता त्यात एक महिन्याच्या बाळाचा मृतदेह आढळून आले. यासंदर्भात सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. चौकशीदरम्यान या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
लखनऊच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी एक चिमुकल्याचा मृतदेह मालवाहू सामानाच्या स्कॅनिंगदरम्यान आढळून आल्याने खळबळ उडाली. या नवजात बालकाचा मृतदेह कुरिअर एजंटच्या सामानाच्या बॉक्समध्ये आढळून आला. बालकाचा मृतदेह आढळल्याने मालवाहू कामगारांमध्ये घबराट पसरली होती. मालवाहू कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफला कळवल्यानंतर लगेच कुरिअरसाठी आलेल्या तरुणाला पकडून सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले. सीआयएसएफच्या चौकशीदरम्यान या तरुणाला सापडलेल्या मृतदेहाबाबत काहीही सांगता आले नाही.
विमानतळावर सामानाचे स्कॅनिंग सुरू होते. दरम्यान, एक कुरिअर एजंटही पार्सल घेऊन आला. इतर वस्तूंचे स्कॅनिंग करताना प्लास्टिकचा बॉक्स स्कॅनरमध्ये टाकला असता त्यात नवजात बालकाचा मृतदेह दिसला. त्यानंतर बॉक्स उघडताच कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. मृतदेह एका महिन्याच्या चिमुकल्याचा होता. कर्मचाऱ्यांनी कुरिअर एजंटला पकडून सीआयएसएफच्या ताब्यात दिले. या पार्सलवर नवी मुंबईचा पत्ता देण्यात आला होता.
विमानतळ पोलिसांनी चौकशी केल्यानंतर इंदिरा नगर येथील आयव्हीएफ केंद्रातून मृतदेह चाचणीसाठी नवी मुंबईला पाठवला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नवजात मुलाचा मृतदेह नवी मुंबईला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात येत होता. आयव्हीएफद्वारे जन्मलेल्या मुलाचा मृतदेह मुंबईला तपासणीसाठी पाठवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. लखनऊ येथील एका पती-पत्नीने एका कुरिअर कंपनीला मृतदेह पाठवण्याची परवानगी दिली होती. एका नामांकित कुरिअर कंपनीला मुलाचा मृतदेह रस्त्याने पाठवायचा होता. कुरिअर कंपनीने चुकून विमानाने पार्सल विमानाने पाठवले होते.