६८ लाखांच्या ‘पायरेटेड’ पुस्तकांचा साठा जप्त
By admin | Published: February 2, 2017 02:34 AM2017-02-02T02:34:57+5:302017-02-02T02:34:57+5:30
देशातील प्रतिष्ठित प्रकाशक संस्थांच्या पुस्तकांच्या ‘पायरेटेड’ प्रती छापून त्या अतिशय कमी किमतीत विकणाऱ्या चार आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली
कोतवाली पोलिसांची कारवाई : चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : देशातील प्रतिष्ठित प्रकाशक संस्थांच्या पुस्तकांच्या ‘पायरेटेड’ प्रती छापून त्या अतिशय कमी किमतीत विकणाऱ्या चार आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ६८ लाख रुपये इतक्या किमतीचा पुस्तकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी नवाबपुरा येथील गणपती मंदिराजवळ टाकलेल्या धाडीत बनावट पुस्तकांचे हे घबाड सापडले.
याप्रकरणी राजेश लांजेवार, प्रकाश नाकाडे, विजय देशमुख व अरुण पौनीकर या चार आरोपींविरुद्ध बनावट पुस्तक छापून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या पुस्तक साठ्यात राजहंस, पॉप्युलर, चैताली, एस. चाँद, आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस अशा नामांकित प्रकाशक कंपन्यांची पुस्तके आहेत.
हे आरोपी या कंपन्यांची बनावट पुस्तके छापून शहरातील पुस्तक विक्रेत्यांना अतिशय कमी किमतीत विकायचे व स्वत:ही स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गांपुढे स्टॉल लावून पुस्तकांची विक्री करायचे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक खुशाल तिमारे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर बोरकुटे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी तोटेवाड, पोलीस हवालदार विजय त्रिवेदी, प्रकाश सुरजुसे, जयंता शेलोट, मनोज ढोले, किशोर हाते, दुर्गादास माकडे व प्रसनजित जांभूळकर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
या तपासात या प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्ट होईल.(प्रतिनिधी)