शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स २३ हजारच्या खाली
By admin | Published: February 11, 2016 04:15 PM2016-02-11T16:15:30+5:302016-02-11T16:57:29+5:30
तरणीला लागलेल्या शेअर बाजाराने गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल ८०० अंकांनी कोसळून २३ हजारांच्या खाली बंद झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - उतरणीला लागलेल्या शेअर बाजाराने गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल ८०० अंकांनी कोसळून २३ हजारांच्या खाली बंद झाला. या घसरणीचा राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही फटका बसला.
निफ्टीनेही २३९ अंकांनी घसरुन सात हजारच्या खाली ६९७६ अंकांवर बंद झाला. मे २०१४ नंतर झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे. बांधकाम, ऊर्जा, बँक, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि धातू कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
बीएसई सेन्सेक्समध्ये ३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येण्याची शक्यता असल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात आज पडझड झाली. स्टेट बँक ऑफ इंडियाचा तिमाहीचा नफा दोन-तृतीयांशपेक्षा कमी झाल्यामुळे स्टेट बँकेच्या शेअर्समध्येही घसरण झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ३.४ टक्के घसरण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही सर्वात मोठी घसरण आहे. मागच्यावर्षी २४ ऑगस्टनंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. चीनी अर्थव्यवस्थेमुळे २४ ऑगस्टला शेअर बाजार कोसळला होता.