आझम खान यांच्या विद्यापीठात सापडली 1774 मध्ये चोरीस गेलेली पुस्तके
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 06:10 PM2019-07-30T18:10:26+5:302019-07-30T18:10:56+5:30
विद्यापीठावर टाकण्यात आलेल्या छाप्यात सुमारे 245 वर्षांपूर्वी 1774 मध्ये चोरीस गेलेली पुस्तके आढळून आली आहेत.
लखनौ - समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान गेल्या काही काळापासून सातत्याने अडचणीत सापडत आहेत. आता नव्या प्रकरणामध्ये रामपूर येथे असलेला आझम खान यांच्या विद्यापीठावर टाकण्यात आलेल्या छाप्यात सुमारे 245 वर्षांपूर्वी 1774 मध्ये चोरीस गेलेली पुस्तके आढळून आली आहेत. रामपूर येथील जौहर विद्यापीठावर टाकण्यात आलेल्या या धाडीत सुमारे 300 पुस्तके जप्त करण्यात आली असून, ही पुस्तके 100 ते 150 वर्षांपूर्वीची असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी विद्यापीठातील चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी अजय शर्मा यांनी सांगितले की, 'रामपूरमधील मदरसा आलिया येथून 1774 मध्ये काही प्राचीन पुस्तके चोरीस गेली होती. ही पुस्तके जौहर विद्यापीठाच्या वाचनालयातून जप्त करण्यात आली आहेत.' दरम्यान, सध्या विद्यापीठाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी विद्यापीठाच्या आवारात उपस्थित असून, शोधमोहीम सुरू आहे.
मदरसा आलियामधील पुस्तकांच्या चोरीबाबतच्या तपासासाठी जौहर विद्यापीठामध्ये शोधमोहीम राबवण्यात आली होती. विद्यापीठातील मुमताज सेंट्रल लाइब्ररीमध्ये सीओंसह पोलीस अधिकारी तपास करत आहेत. याआधीही जौहर विद्यापीठाविरोधात प्रशासनाकडून काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून कारवाईचे आदेश देण्यात आले होते.