राममंदिरासाठीच्या दगडाचे कोरीव काम थांबविले, मोदींचा मंत्र्यांना 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 07:33 AM2019-11-08T07:33:51+5:302019-11-08T07:34:16+5:30

अयोध्या निकालाआधी निर्णय : लोकांनी घरी केला अन्नधान्याचा साठा

The stone carving for Ram Mandir stopped, Modi advised 'Ha' to the ministers | राममंदिरासाठीच्या दगडाचे कोरीव काम थांबविले, मोदींचा मंत्र्यांना 'हा' सल्ला

राममंदिरासाठीच्या दगडाचे कोरीव काम थांबविले, मोदींचा मंत्र्यांना 'हा' सल्ला

Next

अयोध्या : रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त २.७७ एकर जमिनीच्या मालकीसंबंधीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होणार असताना त्या जागेवर बांधावयाच्या श्रीराम मंदिरासाठी दगड व संगमरवरावर कोरीव काम करण्याचे गेली ३० वर्षे अव्याहतपणे सुरू असलेले काम अचानकपणे थांबविण्यात आले आहे.

राममंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मंदिरासाठी वापरावयाच्या दगडांवर नक्षी कोरण्याचे काम सध्या थांबविण्यात आले आहे.
हे काम थांबविण्याचे नेमके कारण शर्मा यांनी स्पष्ट केले नाही. मात्र काम केव्हा पुन्हा सुरू करायचे हे नंतर ठरविले जाईल, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘विहिंप’चे अन्य नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काम थांबल्याने त्यासाठी मुद्दाम आणण्यात आलेले कुशल कारागीर गुजरातमध्ये सौराष्ट्र व भूजमध्ये आपापल्या गावी परत गेले आहेत. मात्र येणारे भाविक व पर्यटक यांच्याकडून ऐच्छिक वर्गणी घेण्यासाठी कारसेवकपुरममधील काऊंटर अजूनही सुरू आहेत. १९९० मध्ये उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री असतानापासून वादग्रस्त जागेच्या जवळच असलेल्या कारसेवकपुरम येथील मंदिर निर्माण कार्यशाळेत दगडांचे कोरीव काम अव्याहतपणे सुरू होते. आतापर्यंत १.२५ लाख घनफूट दगडांचे कोरीव काम झाल्याचे ‘विहिंप’चे म्हणणे आहे.
निकालानंतर काय परिस्थिती उद््भवेल या चिंतेने अयोध्येतील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे त्यांनी अनेक दिवस पुरतील इतक्या जीवनावश्यक वस्तू तसेच अन्नधान्याची खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. काहींनी कुटुंबातील महिला व मुलांना अन्यत्र हलविले आहे.

मंत्र्यांनी वायफळ वक्तव्ये करू नयेत : पंतप्रधान

च्रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी वायफळ वक्तव्ये करणे टाळावे, असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

च्या निकालाच्या आधी व नंतर सामाजिक सलोखा कायम राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

च्खटल्याच्या निकालानंतर कोणीही जल्लोष किंवा निदर्शने करू नये, असे आवाहन माजी सॉलिसिटर जनरल एन. संतोष हेगडे यांनी केले आहे.

Web Title: The stone carving for Ram Mandir stopped, Modi advised 'Ha' to the ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.