पश्चिम बंगालमध्ये रामनवमी मिरवणुकीत हिंसाचार, अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 08:20 AM2024-04-18T08:20:59+5:302024-04-18T08:23:03+5:30
या हिंसक घटनेमुळे तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
देशात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात बुधवारी साजरा करण्यात आला. मात्र, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत हिंसाचार झाल्याचे समोर येत आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी शक्तीपूर परिसरात घडली. रामनवमीनिमित्त येथे मिरवणूक काढण्यात आली. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही लोक आपल्या घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहेत.
या हिंसक घटनेमुळे तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आली असून अतिरिक्त फौजफाटा परिसरात पाठवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. तसेच, जखमींना बहारमपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आणि दुकानांची तोडफोड केल्याचा आरोप भाजपाच्या बंगाल युनिटने केला आहे. भाजपाचे नेते आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, "रामनवमीच्या दिवशी मिरवणूक काढण्यासाठी प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती, परंतु शक्तीपूर, बेलडांगा - II ब्लॉक, मुर्शिदाबाद येथे मिरवणुकीवर हल्लेखोरांनी हल्ला केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मिरवणूक अचानक संपली आणि रामभक्तांवर गोळीबार करण्यात आला."
दुसरीकडे, बहरामपूरचे खासदार आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी संध्याकाळी परिसराला भेट दिली. ते म्हणाले, "हिंदूंवर हल्ले होत असल्याचा दावा करत भाजपा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये निदर्शने करत माझ्याकडे जाब विचारला. मात्र, निदर्शने करणाऱ्यांनी त्या लोकांना जाब विचारले पाहिजे, ज्यांना उत्तर देण्याची गरज आहे. तसेच, एका योजनेनुसार दंगल भडकावली जात आहे आणि भाजपाचा विरोध हे सिद्ध करतो. मी निवडणूक आयोगाशी बोललो आहे. शक्तीपूरला अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून एसपी घटनास्थळी आहेत."
दरम्यान, यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर राज्यात दंगल भडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला होता. गेल्या वर्षी, बंगालमध्ये रामनवमीच्या उत्सवादरम्यान हिंसाचार झाला होता, ज्यामुळे भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाला होता.