हरियाणामध्ये भगवा रॅलीवर दगडफेक, गोळीबार; जमावाने गाड्या फोड़ल्या, ५००० भाविक अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 05:03 PM2023-07-31T17:03:41+5:302023-07-31T17:04:02+5:30
चिघळलेली परिस्थिती पाहून नूंह आणि हथीन येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
हरियाणाच्या नूंहमध्ये ब्रज मंडल यात्रेवर दुसऱ्या समाजाच्या लोकांनी दगडफेक केली आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तिथल्या गाड्यांना आग लावली आहे. या तणावामुळे मंदिर परिसरात ५००० हून अधिक लोक अडकले आहेत.
चिघळलेली परिस्थिती पाहून नूंह आणि हथीन येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात आली आहे. गुरुग्राममधून शेकडो वाहनांमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्तेही नलहुद शिव मंदिर नूह येथे भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी गेले होते. या यात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक प्रताप सिंह हे देखील आहेत.
यात्रा शिवमंदिर नळ हुड येथे पोहोचताच एका समाजाच्या समाजकंटक लोकांनी यात्रेवर दगडफेक केली. अनेक वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड केली. हा हल्ला अचानक करण्यात आल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे गुरुग्रामचे जिल्हाध्यक्ष अजित सिंह यांनी केला आहे.
पोलीस अद्याप काहीही बोलण्यास तयार नाहीत. किती जण जखमी झालेत याची माहितीही देण्यात आलेली नाही. या हल्ल्यादरम्यान गोळीबारही झाल्याचे वृत्त आहे. जवळच्या गावातील विशिष्ट समाजाचे लोक तलवारी आणि खंजीर घेऊन नुह येथे पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांनी बाजारपेठ बंद ठेवली आहे. परिस्थिती पाहता नूह तसेच गुरुग्राम आणि पलवलमधील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.