उद्घाटनाआधीच वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, अनेक डब्यांचं नुकसान, पाच अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 02:43 PM2024-09-14T14:43:54+5:302024-09-14T14:43:54+5:30
Stone Pelting On Vande Bharat Train: छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बागबाहरा रेल्वेस्टेशन जवळ वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली.
छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बागबाहरा रेल्वेस्टेशन जवळ वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ट्रेनच्या तीन डब्यांचं नुकसान झालं. या ट्रेनची शुक्रवारी रायपूर ते विशाखापट्टणम दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, विशाखापट्टणम येथून परतताना या ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवून या ट्रेनला रवाना करणार आहेत. दरम्यान, उद्घाटनापूर्वीच या ट्रेनवर दगडफेक झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तपास करत आरपीएफने ५ आरोपींना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रायपूर विशाखापट्टणम वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली ही ट्रेन सकाळी ७ वाजता रवाना झाली. सकाळी नऊ वाजता ही गाडी बागबाहराजवळ पोहोचली असताना काही समाजकंटकांनी धावत्या ट्रेनवर दगडफेक केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध घेत पाच जणांना अटक केली आहे. सर्व आरोपी समाजकंटक असून ते बागबाहरा येथीलच रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.