मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 10:12 AM2023-02-26T10:12:20+5:302023-02-26T10:13:28+5:30
Stone Pelting on Nisith Pramanik Convoy: केंद्रीय गृहराज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर ते पश्चिम बंगालमधील कूचबिहारच्या दिनहाटा परिसराच्या दौऱ्यावर असताना हल्ला झाला. संतप्त जमावाने त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर ते पश्चिम बंगालमधील कूचबिहारच्या दिनहाटा परिसराच्या दौऱ्यावर असताना हल्ला झाला. संतप्त जमावाने त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रामाणिक यांनी केला. या हल्ल्यात प्रामाणिक यांच्या कारच्या काचा फुटल्या. नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. निशिथ प्रामाणिक हे कुचबिहारमधील खासदार आहेत. ते म्हणाले की, जर एक मंत्री सुरक्षित नसेल. तर तुम्ही सर्वसामान्यांच्या दुर्दशेची कल्पनाच करू शकता. ही घटना पश्चिम बंगालमधील लोकशाहीची परिस्थिती दाखवणारी आहे.
या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल करताना निशिथ प्रामाणिक यांनी राज्यात लोकशाही उद्ध्वस्त झाली आहे, असा आरोप केला. तसेच जे लोक दगडफेक, बॉम्बफेक करत आहेत, त्यांना पोलीस संरक्षण देत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तर पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, बंगालची जनता असुरक्षित आहे. आमच्या राज्यपालांवर जो हल्ला झाला, तो अचानक झालेला नाही. हा हल्ला पोलिसांच्या देखरेखीखाली झाला आहे. केंद्र सरकारने याविरोधात कारवाई केली पाहिजे. एसपी कुचबिहार आणि आणि डीजीपींविरोधात कारवाई झाली पाहिजे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार बीएसएफच्या कथित गोळीबारामध्ये एका आदिवासी व्यक्तीचा मृत्यू झाल होता. या मृत्युमुळे प्रामाणिक यांच्याविरोधात रोष आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी हल्लीच कूचबिहारमध्ये एका सभेमध्ये हत्येच्या घटनेनंतर योग्य ती पावले उचलण्यात आली नाहीत, असा आरोप प्रामाणिक यांच्यावर केला.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी या घटनेनंतर स्थानिक लोकांचं आंदोलन होत आहे. हे आंदोलन भाजपाने भडकवलं आहे. तिथे आधीपासून काही समस्या आहेत. अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र तृणमूल काँग्रेसचा त्यामध्ये सहभाग नाही आहे.