दिल्लीवरचे आरोप थांबवा; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:42 AM2022-07-26T06:42:51+5:302022-07-26T06:43:21+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अडीच वर्षे दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबले पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या समर्थकांना दिला आहे. राज्य आणि केंद्राच्या चांगल्या संबंधांमुळे राज्याचा गाडा सुरळीत चालू शकतो, याचा विचार गेली अडीच वर्षे केला नाही असेही ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलणार नाही. त्यांच्यावर टीकाही करणार नाही, असे केसरकर यांनी आधी म्हटले होते. मात्र, आज ते पत्रपरिषदेत ते म्हणाले की, त्यांचे प्रवक्ते रोज सकाळी उठून केंद्रावर टीका करत होते. त्यामुळे केंद्रासोबत असलेले संबंध बिघडले. गेली अडीच वर्षे राजकारण सुरू होते. दिल्लीवर आरोप सुरू होते. आता हे राजकारण थांबले पाहिजे. त्यांनी, हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढला. आमच्यासोबत आलेल्या खासदारांच्या घरांवर मोर्चे
काढले जात आहेत. त्यांना जाब विचारले जात आहेत. लोकांना का भडकवताय? असा थेट सवाल त्यांनी उद्धव यांना केला. कालपर्यंत कुठेही न फिरणारे आता फिरू लागलेत. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील कार्यालयात ते किती वेळा गेले आणि काय काम केले? बांधावर जा म्हणून सांगायचे. मग, आता कार्यकर्त्यांना सांगून बांधावर जायला का सांगत नाहीत? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला.
‘ठाकरेंनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे सुरू होते. मात्र, १२ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर हे बोलणे थांबले हे खरे आहे का, या प्रश्नासह तीन प्रश्न मी विचारले होते. मात्र, एकाही प्रश्नावर ते उत्तर देऊ शकले नाहीत. आज ज्या काही भावना भडकावल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. आज राज्याला शांतता हवी आहे. ती लोकांना आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. ती शांतता राज्याला द्यायची की नाही याचा विचार केला पाहिजे, असे केसरकर म्हणाले.