Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रद्द करा! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं राहुल गांधी यांना पत्र, कारणही सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 11:12 AM2022-12-21T11:12:02+5:302022-12-21T11:14:34+5:30
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून 'भारत जोडो यात्रा' रद्द करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली-
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून 'भारत जोडो यात्रा' रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं कडक पालन केलं जावं आणि प्रोटोकॉलचं पालन करणं जमत नसेल तर यात्रा देशाचं हित पाहून यात्रा स्थगित करा, असं मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
"राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जावा. तसंच केवळ कोरोना लसीकरण पूर्ण केलेलेच लोक यात्रेत सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. तसंच यात्रेत सामील होण्याआधी आणि नंतर लोकांचं आयसोलेशन केलं जावं", असं मनसुख मांडविय यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच कोरोना प्रोटोकॉलचं पालन करणं शक्य नसेल तर पब्लिक हेल्थ इमर्जंन्सीची स्थिती लक्षात घेऊन कोरोना महामारीपासून देशाला वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशहितासाठी स्थगित करावी असंही मांडविय यांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आता राहुल गांधी यावर काय प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Union Health Minister Mansukh Mandaviya y'day wrote to Congress MP Rahul Gandhi & Rajasthan CM Ashok Gehlot.
— ANI (@ANI) December 21, 2022
Letter reads that COVID guidelines be strictly followed during Bharat Jodo Yatra & use of masks-sanitiser be implemented; mentions that only vaccinated people participate pic.twitter.com/cRIyZz0DLY
राजस्थानच्या खासदारांनी केली होती तक्रार
राजस्थानचे खासदार पीपी चौधरी, निहाल चंद, देवची पटेल यांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेत कोरोना महामारीचा प्रसार होत असल्याची तक्रार केली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून राजस्थानमध्ये सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. यात देशातील विविध राज्यांचे लोक सहभागी होत आहे. दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांकडून राजस्थानात कोरोना प्रसाराचा धोका आहे. तसंच यात्रेत सामील होणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं देखील आढळून आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू देखील यात्रेतून माघारी परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा रद्द केली जावी, अशी मागणी खासदारांनी केली आहे.