बृजभूषण यांना रोखा, अन्यथा...; राज ठाकरेंना पाठिंबा देत कांचनगिरींचं थेट नरेंद्र मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 10:15 AM2022-05-19T10:15:52+5:302022-05-19T10:16:41+5:30
राज ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न करू नका. प्रभू राम सगळ्यांचे आहेत. कुण्या एकट्याचे नाही. देवदर्शनासाठी हिंदूंनी यायचं नाही तर मुघलांनी यायचं का? असा सवाल कांचनगिरी यांनी केला आहे.
अयोध्या – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या(MNS Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना रोखावं अन्यथा संत, नागासाधू यांचा सामना करावा लागेल असं थेट पत्र कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. राजकीय लढाई करायची असेल तर जरूर करा, पण देवदर्शनासाठी जर कुणाला अडवत असाल तर याद राखा. सर्व साधू संतांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा आहे असं गुरु माँ कांचनगिरी यांनी सांगितले.
कांचनगिरी म्हणाल्या की, राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला. राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते. पूर्ण महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी काम केले. बृजभूषण सिंह यांनी स्वत:कडे पाहावं. ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत. त्यांनी इतरांना शिकवू नये. राजकीय पब्लिसिटीसाठी ते चमकोगिरी करत आहेत. बृजभूषण यांनी त्यांचा इतिहास बाहेर काढण्यासारखी वेळ आणू नये. तुम्हाला उत्तर प्रदेशातील नागरिकांची दया असती तर कंपनी, फॅक्टरी लावून यूपीतील लोकांना सक्षम बनवलं असतं. राज ठाकरे ५ तारखेला येतील कोण अडवतं ते पाहूच असा इशारा त्यांनी दिला.
तसेच मी एकटीने लालचौकात तिरंगा ध्वज फडकवला होता. बृजभूषण सिंह यांच्या पत्रकार परिषदेत एकटीच भिडली. त्यांचे लोक मला रागाने बघत होते. हे संताचा सन्मान करू शकत नाही. राज ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न करू नका. प्रभू राम सगळ्यांचे आहेत. कुण्या एकट्याचे नाही. देवदर्शनासाठी हिंदूंनी यायचं नाही तर मुघलांनी यायचं का? औवेसीसारखे लोक म्हणतात १ तासासाठी पोलीस हटवा मग बघा, त्यांच्याविरोधात काम करा. आपल्याला हिंदू विचारधारेची गरज आहे. राज ठाकरेंना रोखण्याआधी माझा सामना करावा लागेल. प्रसिद्धीसाठी बृजभूषण सिंह स्टंटबाजी करत आहेत. राज ठाकरे माफी मागणार नाही असं कांचनगिरी यांनी सांगितले.
त्याचसोबत योगी सरकारने बृजभूषण सिंह यांना रोखावं. योगी राज्यात बृजभूषण यांचे काहीही चालणार नाही. बृजभूषण यांची लढाई व्यक्तिगत असेल तर आमचीही व्यक्तिगत लढाई आहे. आमच्याशी लढावं त्यानंतर सिंहाशी लढावं. आम्ही साध्वी आहोत. आमच्यामागेही अनुयायी आहेत. जिथे तुम्ही रोखाल तिथे आम्ही तुम्हाला विरोध करू. शक्तीशी लढा मग सिंहाशी लढावं असं आव्हान कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांना दिलं आहे.
बृजभूषण सिंह यांचा इशारा
''मी म्हणतो की राज ठाकरे उंदीर आहे. ते बिळात राहातात. त्या बिळातून बाहेर येत नाहीत. आत्तापर्यंत ते बाहेर आले नाहीत. पहिल्यांदाच ते हा दौरा करणार आहेत. त्यामुळे मी विरोध करत आहे. मी ठरवलं आहे की ५ तारखेला त्यांना उत्तर प्रदेशच्या धरतीवर घुसू देणार नाही. मी म्हटलंय म्हणजे घुसू देणारच नाही,'' अशा शब्दात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना इशारा दिला.