पाकसोबत वस्तुविनिमय होणार बंद, एनआयएची शिफारस, व्यवहारांतून दहशतवादाला मिळाले १ हजार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:47 AM2017-09-13T01:47:08+5:302017-09-13T01:47:08+5:30
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांमध्ये व्यापार व सौहार्द वाढीस लागण्याच्या हेतूने सुरू झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील वस्तुविनिमय व्यापार (बार्टर ट्रेड) बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधानांचे कार्यालय लवकरच घेईल.
उच्च पातळीवरील सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपासणी संस्थेने (एनआयए) हा व्यापार बंद करण्यात यावा, अशी आग्रही शिफारस केल्यामुळे पीएमओने त्यात लक्ष घातले आहे. एनआयएने अहवाल गृह मंत्रालयाला सादर केल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम लक्षात घेऊ न तो विषय पीएमओकडे पाठवण्यात आला.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सूचनेवरून गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी २००८ साली व्यापार करार केला. या व्यापारात रोख पैशांचा वापर करण्याऐवजी २१ वस्तूंचा विनिमय असावा, असा निर्णय घेण्यात आला होता. वस्तूंची किंमत व्यापाºयांनी आपापसांत ठरवायची होती; तसेच या वस्तू जम्मू-काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरमध्येच उत्पादित होणाºया असाव्यात, असे ठरले होते. परंतु जे घडले त्यामुळे एनआयएचे डोळेच उघडले. कॅलिफोर्नियातील बदाम पाकिस्तानातून आले आणि ते पाकव्याप्त काश्मीरमधील असल्याचे सांगण्यात आले.
या वर्षी २३ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने वस्तुविनिमय व्यापार की दहशतवादाला पैसा (बार्टर ट्रेड आॅर टेरर फंडिंग) हे वृत्त प्रकाशित केले होते. एनआयएने देशभर छापे टाकून दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील ३५० व्यापाºयांच्या दप्तरांची छाननी केली होती. त्या वेळी यात ३०० कोटी रुपयांच्या हवाला व्यवहाराचे रॅकेट असू शकेल असा अंदाजएनआयएने व्यक्त केला होता.
वरिष्ठ सूत्रांच्या मते हा हवाला घोटाळा एक हजार कोटी रुपयांचा असू शकेल. या व्यापाराद्वारे दहशतवादी गटांना व सुरक्षा दलांवर दगडफेक करणाºयांना शेकडो कोटी रुपये कसे पोहोचतात, याचा तपशील एनआयएने अहवालात दिला होता. एनआयएने म्हटले आहे की, या व्यापारातून तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम तयार झाली असून, त्यातील किमान एक हजार कोटी रुपये काश्मिरी दहशतवाद्यांना व हुर्रियत नेत्यांसह त्यांच्या आश्रयदात्यांना पोहोचले आहेत. सीमेवरील व्यापाºयांपासून सुरू झालेला पैशांचा प्रवास दिल्लीतील व प्रमुख शहरांतील व्यापाºयांपर्यंत कसा होत आहे आणि हुर्रियतचे नेते व दहशतवादी यांच्यापर्यंत ते पैसे कसे पोहोचतात, याचा तपशील या अहवालात आहे. मालाची किमत कमी व जास्त दाखवण्यासाठी बँकेचा वापर कसा करण्यात आला व हा प्रकार जवळपास आठ वर्षे कसा विनातपासणीचा राहिला याचा तपशील या अहवालात आहे.
पैशांचा असा होतो वापर
लश्कर- ए- तय्यबा, जैश- ए- मोहम्मद व अन्य संघटनांकडून होणारा पैशांचा पुरवठा आणि नियंत्रण रेषेपलीकडील व्यापारातून निर्माण झालेला पैसा यांचा परस्परांशी संबंध आहे.
वस्तूंची आयात आणि निर्यातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होते आणि काश्मीरमध्ये नागरिकांत अस्वस्थता निर्माण करण्यासाठी तो पैसा वापरला जातो याचे पुरावे गृह मंत्रालयाला दिले गेले होते.
व्यापार बंद करू नका : मेहबुबा
पाकिस्तानातून तस्करी झालेली शस्त्रे आणि दारूगोळा लपवण्यासाठी काही व्यापाºयांनी ट्रकदेखील पुरवले असावेत, असा एनआयएचा संशय आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे, असे कळते. मुफ्ती यांनी हा व्यापार करार रद्द करण्यात येऊ नये, असे आवाहन पंतप्रधानांना केले आहे.