Amit Shah: हिंमत असेल तर राम मंदिर उभारणीचं काम रोखून दाखवाच; अमित शाहांचं सपा, बसपा, काँग्रेसला खुलं आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 03:30 PM2021-12-31T15:30:06+5:302021-12-31T15:31:01+5:30
भाजपा नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अयोध्येत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवावच, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं आहे.
अयोध्या-
भाजपा नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अयोध्येत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवावच, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं आहे. तसंच बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी सपा, बसपा आणि काँग्रेसवाल्यांनीच कारसेवकांवर गोळीबार केला होता हे कुणी कधी विसरू शकणार नाही, असंही शहा म्हणाले. आज उत्तर प्रदेशातभाजपाच्या सरकारमुळे माफिया राज स्वत: पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण करत आहेत, असंही ते पुढे म्हणाले.
"ज्या कुणाचा राम मंदिर उभारणीचं काम थांबवण्याचा इरादा आहे. त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही काम थांबवून दाखवाच. इतकी हिंमत कुणातच नाही. पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं पुनर्निमाण केलं. औरंगजेबाच्या काळात जो बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी येत असे त्या निराश होऊन माघारी परतावं लागत होतं", असं अमित शहा म्हणाले.
"बुआ बबुआ आणि काँग्रेस पक्षानं कधीच उत्तर प्रदेशचा विकास केला नाही. सपाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यात फक्त गुंडगिरी आणि माफियाराजचा विकास झाला. आमच्या लोकांना पळ काढण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. योगींचं सरकार आल्यांतर दुसऱ्यांना पळवणारे आज स्वत: पळ काढत आहेत. याआधी माफियांना पोलीस प्रशासन घाबर होतं. पण आता माफिया स्वत: पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण करत आहेत", असंही अमित शाह म्हणाले.
बुआ बबुआ सरकारच्या काळात आपल्या प्रतिकांचा सन्मान होत नव्हता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येकाच्या आस्थेचा सन्मान केला आहे. जनतेनं संपूर्ण बहुमतानं मोदींना पंतप्रधानपदी बसवलं आणि भाजपाचं सरकार देशात आणलं. आज मला पाहायला मिळतंय की रामलल्लाचं मंदिर आज साकार होण्यास सुरुवात झाली आहे, असं अमित शाह म्हणाले.
राम लल्लाचं मंदिर होऊ नये यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपानं त्यांच्या शासनकाळात खूप प्रयत्न केले. त्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता याची तुम्हाला आठवण असेल. कारसेवकांवर लाढीचार्ज केला होता. कारसेवकांना मारून त्यांचे मृतदेह शरयू नदीत टाकले होते, असं अमित शहा उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.