Farmer Protest: ‘आंदोलनाला बदनाम करणे थांबवा!’; संयुक्त किसान मोर्चाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 05:58 AM2020-12-17T05:58:49+5:302020-12-17T05:58:58+5:30
शेतकरी संघटनेच्या अंबावत गटाने चिल्ला सीमेवर धडक दिली असून, गुरुवारपासून दिल्ली-नोएडा रस्ता बंद करण्याची घोषणा केली आहे.
- विकास झाडे
नवी दिल्ली : तुमच्यासोबत अनेक बैठका झाल्यात, कायदे मागे घ्या, हे आम्ही प्रत्येक बैठकीत ठामपणे मांडले आहे. आता या आंदोलनाला बदनाम करण्याचे थांबवा आणि अन्य संघटनांसोबत समानांतर चर्चा करण्याचे षडयंत्रही करू नका, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने पत्राद्वारे दिला आहे.
शेतकरी संघटनेसोबत मंत्रिगटाच्या पाच बैठका झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारकडे लिखित मागितले. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठक झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना लिखित प्रस्ताव पाठविला होता. सरकारने कायद्यात संशोधन करण्याची तयारी दर्शविली होती व शेतकऱ्यांकडून प्रत्युत्तराची सरकार अपेक्षा करीत होती. संयुक्त किसान मोर्चातर्फे प्रोफेसर दर्शन पाल यांनी कृषिमंत्र्याना लिखित उत्तर दिले. शेतकरी संघटनेच्या अंबावत गटाने चिल्ला सीमेवर धडक दिली असून, गुरुवारपासून दिल्ली-नोएडा रस्ता बंद करण्याची घोषणा केली आहे.
माजी सैनिकांची साथ
संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन पुन्हा आक्रमक करण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माजी सैनिकांनी पाठिंबा दिला आहे. गाजीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी माजी सैनिकांची साथ मिळाली.